माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. समाजात वावरत असताना आपण आपली घाई गडबड आणि आपल्या वेळा कायमच सांभाळत असतो. अनेकदा अनेक गोष्टींकडे, व्यक्तींकडे आपलं दुर्लक्षही होतं कारण आपल्याला वेळ सांभाळायची असते. स्वच्छता करणारे कर्मचारी हा देखील असाच एक घटक ज्यांच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. स्वच्छता करणं हे त्यांचं कामच आहे असं मानतो, आपण काम करतो तसंच त्यांचंही ते काम आहे त्यांनी ते केलं पाहिजे असंही अनेकांना वाटत असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. स्वच्छता कर्मचारी महिलेला एका महिलेने थांबवलं आणि तिला चहा प्यायला दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओचं कौतुक का होतं आहे?

Official_cg_ratna या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. ‘सुबह ६ बजे निकल जाते हैं.. हमारे गली, मोहल्ले को साफ करते हैं… तो एक कप चाय बनती है.’ सकाळी ६ वाजता हे लोक बाहेर पडतात, आपली गल्ली, आपला परिसर स्वच्छ करतात त्यांना एक कप चहा तर दिला पाहिजे असं म्हणत ही पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये एक मुलगी स्वच्छता कर्मचारी महिलेला चहाचा कप देताना दिसत आहे. ती ट्रेमध्ये चहाचा कप घेऊन येते आणि या स्वच्छता कर्मचारी महिलेला देते. ज्यानंतर ही महिला रस्त्याच्या बाजूला बसते आणि चहा घेते, तसंच समाधान व्यक्त करताना दिसते आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो आहे.

सोशल मीडियावर काय म्हणत आहेत लोक?

एक युजर म्हणतो समाजाप्रती आपणही देणं लागतो. तुम्ही त्या महिलेला चहा दिलात हे बरंच झालं. माझी आई देखील असं करते. एका युजरने म्हटलं आहे की माझे वडीलही अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना चहा-पाणी देत असतात आणि त्यांची विचारपूस करत असतात. तुम्ही हे केलंत ते चांगलंच झालं. अशा प्रकारे स्वच्छता कर्मचाऱ्यांची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्यांच्यामुळेच आपला रस्ता, परिसर स्वच्छ राहतो हे आपण विसरलेलो असतो असंही काही युजर्स म्हणत आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. खूपच चांगली कृती आणि चांगला निर्णय याचा आदर्श आपणही घेतला पाहिजे असंही काही युजर्स म्हणत आहेत. इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हयारल झाला आहे. या मुलीच्या कृतीचं कौतुक केलं जातं आहे आणि माणुसकी अजूनही शिल्लक आहे असंही अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलंंय.