Kolkata Doctor Rape Murder Case Ganesh Mandap Theme : कोलकातामधील आर जी कर मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आली होती, या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. दरम्यान, आरोपीला फाशी देण्याच्या शिक्षेच्या मागणीसाठी देशभरातून आंदोलनं, निदर्शनं सुरू आहेत. अनेक राज्यांतील रहिवासी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. याचदरम्यान गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांमधूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशाच एका गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी एक भव्यदिव्य देखावा तयार करण्यात आला आहे, जो पाहण्यासाठी लोक आता गर्दी करत आहेत. खऱ्या अर्थाने हा सामाजिक संदेश देणारा देखावा असल्याचे म्हटले आहे.

कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या मागणीसाठी हा देखावा साकारण्यात आला आहे. हैदराबादमधील ओसमानगंज मार्केट परिसरातील एका गणेशोत्सव मंडळाने हा भव्य देखावा साकारला आहे, जो पाहिल्यानंतर प्रत्येक जण आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळावा ही अपेक्षा करत आहेत.

या देखाव्याच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, गणपती बाप्पाची एक भलीमोठी, शक्तीशाली मूर्ती उभी आहे, जाच्या एका हातावर माता पार्वती बसलेली दाखवण्यात आली आहे, तर त्याच हाताने आरोपीच्या गळ्याभोवती बांधलेला फाशीचा दोर पकडला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला फासावर लटकवल्याचे दृश्य यात दिसतेय. तर त्या खाली डॉक्टर तरुणीचा पुतळा बसवण्यात आला आहे आणि तिच्या बाजूला गणपतीच्या तीन छोट्या छोट्या मूर्ती आहेत. यातून कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, ही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – खतरनाक धुलाई! बंदुकीचा धाक दाखवून करू लागले बाईक चोरी, पण काही मिनिटांत उलटलं चित्र; पाहा थरारक घटनेचा VIDEO

या देखाव्याचा व्हिडीओ @south_indian_festivals नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी हाच खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश देणारा देखावा असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी गणपत्ती बाप्पा, अपराध करणाऱ्याला कठोर शिक्षा कर असे साकडं घातलं आहे. ही थीम जरी सर्वांना आवडली असली तरी अनेकांना यात सिक्स पॅकमधील गणपती बाप्पाचे रुप तितकेसे आवडले नाही, त्यामुळे संमिश्र अशा प्रतिक्रिया या देखाव्यावर येत आहेत.