Monsoon Fishing Video : पहिल्या पावसाची सर पडताच निसर्गाचे वेगवेगळे रुप आपल्याला पाहायला मिळते. यातील काही दृश्य ही खरंच थक्क करणारी असतात, कोणक, गोवा आणि इतर ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, या पावसात अनेक ठिकाणी लोक खेकडे, मासे पकडण्याची मज्जा लुटताना दिसतात, विशेषत: कोकणात पावसात लोक खेकडे आणि चढणीचे मासे पकडण्याचा आनंद लुटताना दिसतात. नदीत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारे चढणीच्या माशांचे दरवर्षी व्हिडिओ व्हायरल होतात. पण तुम्ही कधी ‘चढणीची कोळंबी’ पाहिली आहे का?

सध्या सोशल मीडियावर पावसातील अशाच एका अद्भूत आणि थक्क करणारा मासेमारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात पाण्याच्या पाटातून वर चढणारी कोळंबी पारंपरिक पद्धतीने कशी पकडली जाते, हे दाखवण्यात आलं आहे. हा नजराणा पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत.

नक्की काय असते ‘चढणीची कोळंबी’?

पावसाळा सुरू झाला की समुद्राला लागून असलेल्या खाड्या किंवा नद्यांमधील मोठी कोळंबी (झिंगे) प्रजननासाठी आणि अंडी घालण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास सुरू करते. डोंगराकडून येणाऱ्या ताज्या, गोड्या पाण्याच्या ओढ्यांकडे ही कोळंबी अत्यंत वेगाने वर चढते. पाण्याच्या वेगालाही मात देत खडकांचा, गवताचा आधार घेत त्यांची ही कसरत सुरू असते. यालाच स्थानिक भाषेत ‘चढणीची’ किंवा ‘वेळणीची’ कोळंबी म्हणतात.

चढणीची कोळंबी पकडण्याचा खरा थरार हा रात्रीच्या वेळी असतो. पाऊस पडत असताना गावकरी हातात बॅटरी (टॉर्च) आणि पारंपरिक साधनं घेऊन शेतातील पाटांवर किंवा ओढ्याकाठी उभे राहतात.

बॅटरीच्या प्रकाशात खडकांवर फिरणाऱ्या कोळंब्यांचे डोळे हिऱ्यासारखे चमकतात. अचूक अंदाज घेत ही कोळंबी अगदी अलगद पकडली जाते.

व्हिडीओत पाहू शकता, कसा रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात नदी काठच्या खडकावर कोळंब्या फिरताना दिसतायत. जी पकडण्यासाठी नदीच्या काठाजवळ जाळी लावण्यात आली आहे. नदीच्या वाढत्या प्रवाहाबरोबर खडकांवर फिरणाऱ्या कोळंब्या वाहत जाऊन थेट जाळीत जमा होत आहेत.

हा निसर्गाचा चमत्कार आणि पारंपरिक मासेमारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.