KSRTC Luxury Bus Viral Video : तुमच्यापैकी अनेकांनी लक्झरी बसमधून प्रवास केलाच असेल. पण, नावाप्रमाणे त्या बसमध्ये कधीच लक्झरी गोष्टींचा अनुभव येत नाही. पण, सध्या सोशल मीडियावर अशा एका लक्झरी बसचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही चक्रावून जाल. कारण या बसमध्ये अशा काही सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या पाहता बस आहे की विमान असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. प्रसिद्ध व्यावसायिक हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केलाय, जो तुफान व्हायरल होतोय.
ही बस केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) ची आहे. याच बसमधील सोयी-सुविधा पाहून तुम्हालाही काही क्षणांसाठी आपण विमानात बसलो आहोत की काय असा भास होईल. ही प्रीमियम बस सेवा तिरुवनंतपुरम ते कोच्चीदरम्यान सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे २०० ते २२७ किलोमीटर आहे.
बसमध्ये मिळतायत ‘या’ लक्झरी सुविधा
बसमध्ये अतिशय मऊ आणि आरामदायी लेदरच्या सीट्स बसवण्यात आल्या आहेत. प्रवासात मनोरंजनासाठी प्रत्येक सीटला स्वतंत्र स्क्रीन देण्यात आली आहे, यासह मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी प्रत्येक सीटजवळ चार्जिंग सॉकेट्स आहेत.
विमानाप्रमाणेच या बसमध्येही प्रवाशांच्या सेवेसाठी बस होस्टेस आहे. व्हिडीओमध्ये या होस्टेस प्रवाशांना गरमागरम चहा, कॉफी आणि शॉर्मा रोलसारखे स्नॅक्स देताना दिसत आहेत.
या बसचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे बसच्या आत बनवलेले अतिशय स्वच्छ आणि सुसज्ज वॉशरूम, ज्यामुळे लांबच्या प्रवासात प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी अनंत रूपनगुडी यांनीही या बस सेवेचे कौतुक केले आहे. आरामदायी सीट्स, उत्तम जेवण, मनोरंजन आणि वॉशरूमची सोय यामुळे KSRTC च्या या नव्या बस सेवेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
