Kulhad Pizza Couple Viral Video: सोशल मीडियावर कुल्हड पिझ्झा कपल या नावाने प्रसिद्ध झालेल्या सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांच्या आयुष्यात मागच्यावर्षी एक भयानक प्रसंग घडला. खासगी क्षणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे दोघेही चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय झाले? याबद्दल त्यांनी नुकतेच भाष्य केले आहे. टॉक विथ नमीत या पॉडकास्टला त्यांनी नुकतीच मुलाखत दिली आणि व्हायरल व्हिडीओबाबत भाष्य केलं. २०२२ साली कुल्हड पिझ्झा विकण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या जोडप्याला पहिलं मुल झालं. त्यानंतर काही दिवसांतच खासगी व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ काही खंडणीखोरांनी तयार केला असून त्यांनी आमच्याकडून पैशांची मागणी केली आहे, त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल करणे थांबवा, अशी विनंती या जोडप्याने केली होती. सदर व्हिडीओ मॉर्फ असल्याचेही त्यांनी सांगितले होते. हे वाचा >> कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’ मात्र काही जणांनी आरोप केला की, जोडप्याने हा व्हिडीओ जाणूनबुजून व्हायरल केला असून यामाध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळवायची होती. जेणेकरून त्यांचे हॉटेल आणखी चालेल. पॉडकास्टमध्ये बोलताना दोघांनीही या आरोपाचे खंडन केले. गुरमीत कौर म्हणाली की, लोक आम्हाला म्हणतात की, प्रसिद्धीसाठी आम्ही व्हिडीओ लीक केला. पण आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही आधीच प्रसिद्ध झालो होतो. गुरमीतने पुढे सांगितले, "आम्ही छोट्याश्या गाडीपासून व्यवसाय करण्यास सुरुवात केली आणि त्याचे रुपांतर हॉटेलमध्ये केले. आज आमचा व्यवसाय १० टक्क्यांनी घसरला आहे. कोणती व्यक्ती स्वतःचा व्यवसाय कमी करण्यासाठी असे कृत्य करेल?" सहज अरोरा म्हणाला की, तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमच्या आयुष्यात अडचणींचा डोंगरच उभा राहिला. आम्ही कित्येक दिवस आमच्या घराबाहेर पडलो नाहीत. माझ्या बायकोनं जेवण बंद केलं होतं. तिला आम्ही विनंती करून थोडं खाऊ घालायचो. या व्हिडीओमुळे आमचे व्यवसाय वाढविण्याचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले. त्यावेळी आम्ही देवाकडे फक्त हीच विनंती करत होतो की, ही वेळ पटकन निघून जाऊ दे.