Ladakh Petrol Pump Mother Emotional Video : आई होणं हा प्रवास सोपा नसतो. बाळ झाल्यापासून ते मोठं होईपर्यंत अनेक प्रकारची जबाबदारी तिला पेलावी लागते. यात जर नोकरी सांभाळून बाळाची काळजी घेणं म्हणजे एक अग्निपरीक्षा असते. पण आव्हान कोणतंही असो, एक आई ते सोपे करून दाखवू शकते. लडाखमधील एका पेट्रोल पंपावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आई आपल्या लहान मुलाला चक्क पाठीवर बांधून काम करताना दिसत आहे, ज्यामुळे हा व्हिडीओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आईच्या समर्थनासाठी लोक पुढे येत आहेत. प्रियांका नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने तिच्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मी माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण टप्प्यातून जात आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्याला ९३ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून या आईची काय मदत करू शकतो अशी विचारणा केली.

लोकांचे प्रेम पाहून प्रियांकाने त्या महिलेशी संपर्क साधला आणि तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलली. या धाडसी आईला कल्पनाही नव्हती की तिचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला असेल आणि तो लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. प्रियांकाने तिला सांगितले की, देशभरात लोकांनी तिला प्रेमळ मेसेज पाठवत पाठिंबा दिला आहे. व्हिडीओ कॉलदरम्यान प्रियांकाने तिच्या मुलाचे नाव आणि वय विचारले आणि आश्वासन दिले की, तिला मिळालेली मदत तिच्या मुलाच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.

प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, सोशल मीडियाची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे, एखाद्या गोष्टीला केवळ व्ह्युज मिळत नाहीत, तर ती लोकांच्या हृदयाला स्पर्श करते.” एका युजरने लिहिले, “ती खरोखरच एक राणी आहे.” दुसऱ्याने म्हटले, “ती एक खरी योद्धा आहे.” आणखी एकाने तिला एक स्वतंत्र आणि कणखर स्त्री म्हटले.