Corporate Culture Viral Post: कॉर्पोरेट जगतात कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि कंपनीचे धोरण यातील अंतर स्पष्ट करणारी एक घटना समोर आली आहे. नोकरीवरून काढल्यानंतर ऑफिसचा लॅपटॉप परत करण्यासाठी गेलेल्या एका बंगळुरूमधील आयटी कर्मचाऱ्याला कंपनीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागला. घरी मुलाचा सांभाळ करायला कोणीही नसल्याने हा कर्मचारी आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला स्वतःबरोबर घेऊन कार्यालयात पोहोचला. मात्र सुरक्षारक्षक आणि प्रशासनाने चिमुकल्याला आत घेण्यास स्पष्ट नकार दिला.

बंगळुरूतील टेक कंपनीत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर आपला हा कटू अनुभव शेअर केला आहे. लॅपटॉप जमा करण्याचा अंतिम दिवस असताना पत्नी कामावर होती आणि मुलाला सांभाळण्यासाठी घरात कोणीही नव्हते. “मुलाला बरोबर नेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी केवळ ५ मिनिटांत लॅपटॉप देऊन बाहेर येणार होतो, तरीही माझ्या दोन वर्षांच्या मुलाला आत सोडले गेले नाही,” असे त्याने नमूद केले. अखेर त्याने सहकाऱ्याला फोन करून १५ मिनिटे मुलाला सांभाळण्यास सांगितले आणि आपले काम पूर्ण केले.

‘कंपनी कधीच तुमचे कुटुंब होऊ शकत नाही’

या घटनेनंतर व्यथित झालेल्या या कर्मचाऱ्याने कॉर्पोरेट संस्कृतीचे वास्तव मांडले आहे. “कंपनीच्या नियमांचे पालन करणे मी समजू शकतो, पण नोकरी गमावल्याच्या दुःखात असताना मिळालेल्या या वागणुकीमुळे माझे डोळे उघडले. आपण वर्षानुवर्षे उशिरापर्यंत काम करतो, सुट्ट्यांचा त्याग करतो आणि कंपनीला स्वतःचे कुटुंब मानतो. मात्र अखेरच्या दिवशी हे केवळ एक व्यावसायिक नाते असल्याचे सिद्ध होते,” अशी भावना त्याने व्यक्त केली.

तसेच, “नोकरीलाच तुमचे संपूर्ण आयुष्य मानू नका. कुटुंबाला वेळ द्या आणि ऑफिसबाहेर स्वतःचे वेगळे जग निर्माण करा,” असा मोलाचा सल्लाही त्याने इतर कर्मचाऱ्यांना दिला.

Bangalore IT Girl Rejects Groom 2 lakh salary
मुलाला दरमहा २ लाख रुपये पगार; तरीही मुलीचा लग्नासाठी नकार, म्हणाली, “त्याचा तो प्रश्न…” (क्लिक करून वाचा संपूर्ण बातमी)

‘शेवटी कंपनी ही कंपनीच असते’

या रेडिट पोस्टमध्ये कर्मचाऱ्याने म्हटले, “तुम्ही अनेक वर्षे कंपनीला वेळ देता, उशीरापर्यंत काम करता, सर्व जबाबदारी घेता आणि तुमच्या कंपनीला तुम्ही आयुष्याचा मोठा भाग समजता. पण जेव्हा तुमचे कंपनीशी असलेले नाते संपते, तेव्हा कंपनी तुमच्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहते. माझ्यासाठी ही परिस्थिती डोळे उघडणारी आणि वास्तवाकडे डोळसपणे पाहणारी ठरत आहे. त्यामुळे माझी इतरांना विनंती आहे की, तुम्ही कुटुंबाची काळजी घ्या, कामाव्यतिरिक्तही आयुष्य असते, त्याकडे लक्ष द्या. कंपनीलाच तुमची ओळख बनवू नका. हा माझा वैयक्तिक अनुभव मी तुमच्यासमोर मांडत आहे. कदाचित तो इतरांनाही लागू पडत असेल.”

नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर कॉर्पोरेट धोरणांवर जोरदार टीका होत आहे. “नोकरीवरून काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वतः जाऊन लॅपटॉप जमा करण्याची गरजच काय? कंपन्यांनी स्वतः कुरिअर बॉक्स पाठवून लॅपटॉप मागवून घेतला पाहिजे,” अशी मागणी अनेक नेटकऱ्यांनी केली. काही युझर्सनी कंपन्यांचे नियम हे कनिष्ठ कर्मचारी आणि वरिष्ठांसाठी वेगळे कसे असतात, यावरही बोट ठेवले.

एका युझरने म्हटले, “तुम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतरही क्षणाचाही विचार न करता तुम्हाला कामावरून काढून टाकले जाऊ शकते किंवा दुसरा कुणीतरी तुमची जागा घेऊ शकतो. पण तुमचे प्रियजन आणि कुटुंबाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. कोणतीही कंपनी तुमचे आरोग्य, तुमचे कुटुंब आणि तुमच्या मनःशांती पेक्षा मोठी नाही. त्यामुळे आपल्या जवळच्या लोकांना जास्तीत जास्त वेळ द्या.”

या घटनेने पुन्हा एकदा कॉर्पोरेट जगतातील ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेच्या मुद्द्यावर तीव्र चर्चा सुरू केली आहे. वरील पोस्टला हजारो लोकांनी समर्थन दिले असून १७०० हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केली आहे.