Lalbaugcha Raja Last Man in Line Video: १४ सप्टेंबरच्या गणेश चतुर्थीपासून यावर्षी गणेशोत्सवाची सुरूवात झाली आहे. भारताबरोबरच परदेशातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पा घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झाले. आज अनंत चतुर्दशीनिमित्त ११ दिवसानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे.

गणेशोत्सवात मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव म्हणजे भक्तांसाठी पंढरीच. अशात मुंबईतील गणेशोत्सव म्हटलं की आपोआप लालबागच्या राजाचं नाव डोळ्यासमोर येतं. लालबागचा राजा हा जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेशमूर्ती सर्वत्र ओळखली जाते. लाखो भाविक दरवर्षी ठीक ठिकाणाहून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. अशात पहिल्या आणि शेवटच्या भाविकाला एक वेगळाच मान असतो. सध्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या शेवटच्या भक्ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लालबागचा राजा व्हिडीओ (Lalbaugcha Raja Viral Video)

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गर्दी हा दरवर्षी चर्चेचा विषय असतो. पण दर्शनाचा शेवटचा दिवस आणि त्यात रांगेत शेवटचा भक्त ही भावना काही औरत असते. दरवर्षी रांग बंद होण्यापूर्वी रांगेत जी शेवटी व्यक्ती उभी असते तिला लालबागच्या राजाच्या शेवटच्या दर्शनाचा लाभ मिळतो. यावर्षीही एका तरुणाला हा लाभ मिळाला आहे. रांगेतला शेवटचा भक्त असल्याने त्याचं पारंपारिक सफेद टोपी घालून स्वागत करण्यात आलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @maazaekdantofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसंच “वर्ष २०२६च्या लालबागच्या राजाच्या रांगेतला शेवटचा माणूस” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला काहीच वेळात २.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “सर्वात भाग्यवान” तर दुसऱ्यानं “देव पावला, जशी राजाची इच्छा” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “तो भाविक दर्शनाची रांग बंद होईल म्हणून १ किलोमीटरपासून पळत आला होता.” एकाने कमेंट करत लिहिलं, “तू इकडे आला नाहीस तुला बाप्पाने बोलावलं आहे.”

दरम्यान, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली असून लाखो भाविकांची गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाचं विसर्जन अगदी थाटामाटात होणार आहे.