Ganpati Visarjan Miravnuk Video : मुंबईतील लालबागच्या राजाचे बुधवारी गिरगाव समु्द्रकिनारी मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. १० दिवस लालबागच्या राजाची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची अशा जयघोषात लालबागच्या राजाला भाविकांनी निरोप दिला, राजाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले होते. लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडताच त्याची एक झलक पाहण्यासाठी अलोट जनसागर जमला होता. याच गर्दीतील एक महिला आणि मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत महिलेला आली फीट…

विसर्जन मिरवणुकीत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत एक महिलादेखील राजाच्या दर्शनासाठी आसुसलेली होती, पण गर्दीत उभी असताना भीतीने महिलेला अचानक फीट आली. या प्रकाराने तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले. पण, तेवढ्यात मुंबई पोलिस पुढे सरसावले आणि त्यांनी या महिलेला तात्काळ पोलिस व्हॅनमध्ये बसवून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याच व्हिडीओत गर्दीत अस्वस्थ झालेल्या तरुणाला पोलिस उचलून उपचारांसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा- ड्रायव्हर जोमात, पॅसेंजर कोमात; गणपती विसर्जन मिरवणुकीतील त्यांचा डान्स VIDEO पाहून तुम्हाला काय वाटतं?

लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी देशभरातून लोक लालबागचा राजा ज्या मार्गाने विसर्जनसाठी निघतो त्या मार्गावर प्रचंद गर्दी करतात. पण, या गर्दीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो, फीट किंवा चक्कर येऊन ते पडतात. अशावेळी लोकांना काय करावे सुचत नाही, पण मुंबई पोलिस जिथे कुठे असतात तिथून धाव घेत अशा लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्परता दाखवतात. अशाप्रकारे या महिला आणि मुलाबाबत मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवून त्वरीत रुग्णालयात उपचारांसाठी नेले.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत @mumbaipolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून अनेकांनी मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला आहे. कारण लालबागच्या राजाला पाहण्यासाठी जमणारी गर्दी नियंत्रित करणे हे काही सोपे काम नाही. लोकांच्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असतात.

ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते ड्युटी करतात. वेळप्रसंगी उपाशी राहून त्यांची कामाची तयारी असते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या व्हायरल व्हिडीओच्या कमेंटमधून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. एक युजरने लिहिले की, मुंबई पोलिसांसारखे पोलिस या जगात कुठेच सापडणार नाहीत. स्वतःच्या घरावर, कुटुंबावर तुळशीपत्र ठेऊन दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधतात ही फार मोठी गोष्ट आहे! सलाम मुंबई पोलिस… तुम्ही आहात म्हणून मुंबईमधील सण अजूनही उत्साहात आणि जल्लोषात साजरे होतात! दुसऱ्या युजरने लिहिले की,किती pressure मध्ये काम करता तुम्ही… स्वतःचे घर सोडून सगळ्यांची काळजी घेता… सलाम तुम्हाला, तिसऱ्या युजरने लिहिले की, माणूस वर्दीतला, साक्षात विठ्ठल!