Lion Died Heartbreaking Video : जंगलाचा राजा, अशी सिंहाची ओळख आहे. बलाढ्य शरीर, आक्रमकता, त्याच्या गर्जनेमुळे संपूर्ण जंगलात त्याची मोठी दहशत पाहायला मिळते. भले भले प्राणी त्याच्या ताकदीपुढे हात टेकतात. तो आपली शिकार अचूक हेरतो आणि संधी मिळताच जोरदार हल्ला करतो. एकदा का सिंहाने हल्ला केला की, मग खुद्द यमराजालादेखील त्या प्राण्याचे प्राण हरण करण्यासाठी खाली उतरावे लागते. कारण, सिंहाने शिकारीवर झेप घेतली की, काही क्षणांतच तो प्राण्याला मृत्युद्वार दाखवतो. जगभरात सिंहांची संख्या कमी होत असली तरी त्यांची दहशत, तो दरारा अजून कायम आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही तुम्हाला सिंहाच्या थरारक शिकारीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, जंगलाच्या या राजाचे आयुष्यातील शेवटचे दिवस कसे असतात, त्याची मरणापूर्वी काय अवस्था असते तुम्ही कधी पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर मरणयातना सहन करणाऱ्या सिंहाचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यातील सिंहाची अवस्था पाहून तुमच्याही काळजात चर्रss होईल. जंगलाच्या राजालाही मरणयातना चुकल्या नाहीत हे हा व्हिडीओ दाखवून देतोय.
मन हेलावून टाकणारे दृश्य
सिंहाचे मृत्यूपूर्वीचे हे क्षण खरंच मन हेलावून टाकणारे आहेत. एकेकाळी ज्या जंगलावर सिंहानं राज्य केलं, त्याच जंगलातील एका झुडपात प्राण सोडण्याची वेळ त्याच्यावर आली. थकल्यानं म्लान झालेला त्याचा देह, असंख्य जखमा… एकंदरीत हा सिंह इतका वृद्ध झालाय की, त्याला धड उभं राहण्याचीही ताकद उरलेली नाही. तरीही या वनराजाने पुन्हा उभे राहण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत सोडले नाहीत. पण, शेवटी मृत्यू कोणालाच चुकला नाही म्हणतात तेचं खरं. जंगलाच्या राजाची मृत्यूपूर्वीची झालेली ती विकलांग अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
वृद्ध सिंहाचा हा अतिशय भावूक करणारा व्हिडीओ केनियातील मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्यातील आहे. स्कार्पेस, असं या सिंहाचं नाव होतं, जो या अभयारण्यातील खूप ताकदवान असा सुप्रसिद्ध सिंह होता, ज्यानं ११ जून २०२१ रोजी वयाच्या १४ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आफ्रिकन सवानाच्या शक्ती, लवचिकता व वन्यसौंदर्याचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. पण त्याच्या मृत्यूपूर्वीचे हे क्षण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून सर्वच जण भावूक झाले आहेत.
…अन् त्यानं मृत्यूला केलं जवळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सांगण्यात आलं की, या सिंहानं ४०० तरसांची शिकार केली, ३०० नर सिंहांना ठार केलं. हा एकमेव असा सिंह होता, ज्यानं एकट्यानं भल्यामोठ्या पाणगेंड्यांची शिकार केली होती. मगरीची पाण्यात जाऊन शिकार केली. त्याच्या शरीरावरील जखमांच्या खुणा त्यानं जंगलावर काय आणि कसं वर्चस्व गाजवलं असेल हे दाखवून देतात. पण, शेवटच्या घटकेला तो गवतावर निपचित पडून राहिला आणि त्यानं मृत्यूला जवळ केलं. ते पाहून गगनभेदी गर्जना करणारा सिंह तो हाच का, असा एखाद्याला प्रश्न पडावा.
सिंहाच्या आयुष्यातील शेवटचे क्षण दर्शविणारा हा व्हिडीओ @raxak_rules नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून भावूक झालेत, जे आता त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं लिहिलं की, हाच खरा अर्थ आहे किंग साईज लाइव्ह लाइफचा. दुसऱ्यानं लिहिलंय की, तो लढाईत हरला नाही हीच त्याची ओळख आहे. तिसऱ्या युजरनं लिहिलं की, बलवानांमध्येही सर्वांत बलवान.