रशियाच्या सैन्यात अनेक तरुण मुलांचा समावेश असून त्या गोंधळलेल्या मुलांना आपण काय करतोय, हे देखील माहीत नाही असा दावा करत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियावर टीका केली होती. आता आणखी अशीच एक घटना समोर आली आहे. त्यात आमच्यासोबत फसवणूक झाली आहे, असं रशियन सैनिकानं सांगितलंय.
युक्रेनियन लोकांनी एक रशियन सैनिकाला त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून पकडलं आणि त्याला नष्ट झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यावर बसवलं. यावेळी तो घाबरलेला दिसत होता. मॉस्कोमधील आपल्या सैन्याला आणि रशियन कमांडरना काय संदेश पाठवायचा आहे असे विचारले असता, युक्रेनियन लोकांनी पकडलेल्या सैनिकाने सांगितले की, “खरं सांगायचं झाल्यास त्यांनी आम्हाला फसवलं आहे. आमच्यापैकी ९० टक्के सैनिक युद्धास तयार नसून आपल्या घरी जाऊ इच्छितो,” असं तो म्हणाला.
मॉस्कोमध्ये घरी परतलेल्या त्याच्या लष्करी वरिष्ठांबद्दल तो म्हणाला की, “आम्हाला जे काही सांगण्यात आले ते सर्व खोटे होते. तुम्ही मला सोडल्यास मी माझ्यासोबतच्या मुलांना युक्रेन सोडण्यास सांगेन. आमच्या घरी आमची कुटुंबं आणि मुलं आहेत,” अशी विनवणी तो करू लागला.इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलंय.
दरम्यान, यापूर्वी असाच एक रशियन सैनिक युक्रेनियन नागरिकांना शरण आला होता. त्यानंतर त्याला खायला देत त्याच्या आईला फोन लावून दिला. यावेळी तो सैनिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
युक्रेनियन लोकांना शरण आल्यानंतर रशियन सैनिक आपल्या आईशी फोनवर बोलत असताना रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रशियन सैन्यातला एका तरुणाने आपली शस्त्रं खाली टाकली आणि शरण गेला. त्यानंतर आपल्या आईशी बोलताना त्याला रडू कोसळलं, त्यावेळी युक्रेनियन महिलांच्या गटाने त्याचं सांत्वन केलं. त्याच्या पाठीवर थाप मारताना एक महिला त्याला ‘सगळे ठीक आहे’ असं सांगते. दुसरी महिला त्याला चहा आणि पेस्ट्री खाण्याची विनंती करते. त्यानंतर तो आपल्या आईला फोन करतो आणि त्याला अश्रू अनावर होतात. नंतर या महिलांपैकीच एक महिला त्याच्या आईला दिलासा देत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. तुमचा मुलगा जिवंत आणि सुखरुप असल्याचं ती महिला सैनिकाच्या आईला सांगते.