Chanakya Niti Money Lending Rules: आपल्या जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकाला अडचणीच्या वेळी मदत करणे हा आपला स्वभाव असतो. मदतीचा हात म्हणून सुरू झालेला हा व्यवहार अनेकदा पुढे जाऊन नात्यात कटुता आणण्यास कारणीभूत ठरतो. दिलेले पैसे वेळेवर परत मिळाले नाहीत की मनात चिडचिड निर्माण होते आणि हळूहळू संवाद, आपुलकी आणि विश्वास सगळंच धुळीस मिळतं.
आचार्य चाणक्य यांनी पैसा, व्यवहार आणि नात्यांवर अत्यंत अचूक नीती सांगितली आहे. भावनिक होऊन निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक विचार कसा करावा, हे चाणक्य नीती आपल्याला शिकवते. जर तुम्हाला तुमचे पैसे आणि अनमोल नाते हे दोन्ही सुरक्षित ठेवायचे असतील, तर मित्रांना किंवा नातेवाईकांना पैसे उधार देताना आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
१. पैसे देण्यापूर्वीच ते ‘गेले’ असे मानून चाला
चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही जवळच्या व्यक्तीला पैसे उधार देण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा की “जर हे पैसे मला परत मिळाले नाहीत, तरीही मी शांत राहू शकेन का?” जर तुमचे उत्तर ‘नाही’ असेल, तर पैसे उधार न देणेच योग्य ठरेल. पण जर तुम्ही मदत करायचे ठरवलेच असेल, तर ते पैसे वेळेवर परत मिळतीलच अशी आशा उराशी बाळगू नका. पैसे दिल्यानंतर “किती दिवस झाले?”, “अजून का दिले नाहीत?”, “माझे पैसे दिले नाहीत अन् हा नवीन गाडी कशी घेतोय?” असा विचार करत राहिलात तर नात्यात ताण निर्माण होतो. त्यामुळे ज्या रकमेचे नुकसान सहन करण्याची तुमची मानसिक तयारी आहे, तेवढीच मदत करा.
२. एवढीच रक्कम द्या, ज्यामुळे नात्यातील आपुलकी संपणार नाही
प्रत्येक व्यक्तीची एक आर्थिक मर्यादा असते. जर तुम्ही एखाद्याला मोठी रक्कम उधार दिली आणि त्याने ती दीर्घकाळ परत केली नाही; तर त्याच्या महागड्या वस्तू, हॉटेलिंग किंवा सण-उत्सवातील खर्च पाहून तुमच्या मनात राग आणि संशय निर्माण होऊ लागतो. इथूनच नात्यातील सहजता संपते. त्यामुळे नेहमी तेवढीच रक्कम उधार द्या, जी परत नाही मिळाली तरी समोरच्या व्यक्तीबद्दलचा तुमचा आदर आणि आपुलकी कायम राहील. लहान रक्कम उशिरा आली तरी नात्याचे नुकसान करत नाही, पण मोठी रक्कम अडकली की संपूर्ण नातं बदलून जातं.
३. रक्कम आणि परतफेडीची तारीख ‘लिखित स्वरूपात’ ठरवा
नातेवाईक किंवा मित्र आहे म्हणून पैशांच्या बाबतीत सर्व काही फक्त तोंडी विश्वासावर सोडू नका, असा सल्ला चाणक्य देतात. किती पैसे दिले आहेत आणि ते कधीपर्यंत परत करायचे आहेत, हे किमान एखाद्या WhatsApp मेसेजमध्ये किंवा एका साध्या कागदावर (Note) स्पष्ट लिहून ठेवा. याचा उद्देश कायदेशीर कारवाई करणे हा नसून दोन्ही बाजूंमध्ये पारदर्शकता ठेवणे हा आहे. अनेकदा “पैसे परत करायची घाई नव्हती” किंवा “नक्की कधी द्यायचे ठरले होते?” यावरून गैरसमज होतात. लिखित स्पष्टता असेल तर उधार घेणाऱ्यावर अनावश्यक मानसिक दडपण राहत नाही आणि देणाऱ्यालाही आठवण करून द्यावी लागत नाही.
४. एका संकटासाठी फक्त ‘एकदाच’ मदत करा
अडचणीच्या काळात मित्राला किंवा नातेवाईकाला मदत करणे उत्तमच आहे. पण पहिली उधारी चुकता न करता जर तो वारंवार पैसे मागू लागला, तर खरी समस्या सुरू होते. पहिल्यांदा केलेली मदत ही ‘आपुलकी’ असू शकते, पण हीच गोष्ट वारंवार घडू लागली तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कायमचा ‘एटीएम’ किंवा ‘आर्थिक आधार’ बनून जाल. त्यामुळे स्वतःचा एक स्पष्ट नियम बनवा— “जोपर्यंत जुने पैसे पूर्ण परत येत नाहीत, तोपर्यंत नवीन उधार नाही.” ही कठोरता नसून नात्यात निरोगी मर्यादा (Healthy Boundaries) ठेवण्याचा मार्ग आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीलाही स्वतःच्या आर्थिक जबाबदारीची जाणीव होते.
५. उधारीच्या पैशांना दुसऱ्या वादात ‘हत्यार’ बनवू नका
अनेकदा कौटुंबिक वाद, भांडण किंवा एखाद्या कार्यक्रमात जुन्या उधारीचा विषय काढला जातो की “मी तुला वेळोवेळी एवढी मदत केली होती”, “आधी माझे पैसे परत कर”, “गरज होती तेव्हा माझ्याकडेच आला होतास ना!” अशा शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीचा अपमान होतो आणि नात्यात असा दुरावा येतो जो कधीही भरून निघत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, पैशांचा हिशोब आपल्या जागी ठेवा आणि नातं आपल्या जागी. पैशांशी संबंधित काही अडचण असेल, तर त्याबद्दल एकांतात, थेट आणि केवळ पैशांच्या विषयावरच बोला. त्याला जुन्या भांडणांशी किंवा व्यक्तीच्या स्वभावाशी जोडू नका.
पैशांचा व्यवहार करताना विवेक आणि स्पष्टता ठेवली, तर पैसे बुडण्याचा धोका कमी होतो आणि अनमोल नातेवाईक किंवा मित्रही दुरावत नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळी कोणालाही पैसे उधार देताना या ५ गोष्टी नक्की आठवा.
