Viral Post Lenscart: सोशल मीडियावर सध्या प्रसिद्ध कंपनी ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) संदर्भात एक मोठा वाद निर्माण झाला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ‘स्टाईल गाईड’चा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला असून, त्यामध्ये टिकली, टिळा यावर बंदी घातल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर कंपनीचे संस्थापक पीयुष बन्सल यांनी स्वतः समोर येत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये असा दावा करण्यात आला की, लेन्सकार्टच्या नियमावलीनुसार कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्याची परवानगी आहे, मात्र टिकली, टिळा किंवा हातातील कलावा (रक्षामंत्र) बांधण्यास मनाई आहे.

प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी एक्स(ट्विटर)वर हा स्क्रीनशॉट शेअर करत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “मी याची खात्री केली आहे, हे खरे आहे. पीयुष बन्सल त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगतात की हिजाब चालतो, पण टिकली किंवा टिळा किंवा देवाचे धागे चालणार नाही. हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतात, जिथे ग्राहक आणि कर्मचारी हिंदू आहेत, तिथे अशा पद्धतीचे नियम का? हे लेन्सकार्टच्या स्टाईल गाईडचे ११ वे पान आहे.”

सोशल मीडियावर संतापाची लाट

या पोस्टनंतर सोशल मीडियावर लेन्सकार्टविरोधात बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू झाली. अनेक वापरकर्त्यांनी कंपनीच्या धोरणांवर टीका केली. एका युजरने कमेंट करत म्हटले की, “हिंदू कर्मचाऱ्यांना कुंकू किंवा टिकली लावण्याचा अधिकार नाकारला जातोय आणि हिजाबला परवानगी? हा दुटप्पीपणा थांबला पाहिजे.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “या माहितीबद्दल धन्यवाद. मी आता लेन्सकार्टकडून कधीच चष्मे विकत घेणार नाही आणि माझ्या ओळखीच्या लोकांनाही या हिंदू-विरोधी संस्थेत पैसे न खर्च करण्यास सांगणार आहे.”

तिसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिली की, “हा निव्वळ मूर्खपणा आहे. भारतात व्यवसाय करायचा आणि इथल्याच लोकांच्या भावना दुखावायच्या, हे लज्जास्पद आहे.”

संस्थापक पीयुष बन्सल यांचे स्पष्टीकरण

वाढता वाद पाहून लेन्सकार्टचे संस्थापक पीयुष बन्सल यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट लिहून परिस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, व्हायरल होत असलेले दस्तऐवज जुने असून ते सध्याच्या धोरणांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

पीयुष बन्सल म्हणाले की, “लेन्सकार्टच्या धोरणाबाबत एक चुकीचा दस्तऐवज व्हायरल होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. मला स्पष्ट करायचे आहे की, हे आमच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रतिबिंब नाही. आमच्या धोरणात टिकली किंवा टिळ्यासह कोणत्याही धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतेही निर्बंध नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “आमची ग्रूमिंग पॉलिसी (वेशभूषा धोरण) गेल्या काही वर्षांत बदलली आहे. जुन्या आवृत्त्या आम्ही आज कोण आहोत हे दर्शवत नाहीत. या गोंधळामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमा मागतो. एक कंपनी म्हणून आम्ही सतत शिकत आहोत आणि आमच्या धोरणांमधील त्रुटी दूर करत आहोत.”

बन्सल यांनी शेवटी ठामपणे सांगितले की, “भारतातील आमचे हजारो कर्मचारी दररोज त्यांच्या श्रद्धेचे आणि संस्कृतीचे प्रतीक अभिमानाने परिधान करतात. लेन्सकार्ट हे भारतीयांनी, भारतीयांसाठी बनवलेले ब्रँड आहे. आमच्या लोकांची प्रत्येक परंपरा हा आमच्या कंपनीचा भाग आहे आणि मी त्याच्याशी कधीही तडजोड करणार नाही.”