Leopard Viral Video: कर्नाटकातील बन्नेरघट्टा नॅशनल पार्कमध्ये गुरुवारी सफारीदरम्यान एक बिबट्या पर्यटकांच्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. या वेळी एका महिलेला दुखापत झाल्याची माहिती मिळाली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बिबट्या बसच्या समोर बसलेला दिसतो आणि पर्यटक त्याला नीट पाहण्याचा प्रयत्न करतात. नंतर बिबट्या उठून बसच्या डाव्या बाजूने चालत जातो.
नंतर व्हिडिओमध्ये बिबट्या खिडकीतून एका महिलेच्या कपड्याचा तुकडा तोंडाने धरून ओढताना दिसतो. खिडक्यांना बाहेर मेटलच्या जाळ्या असल्यामुळे बिबट्या आत येऊ शकला नाही, पण जाळ्या आणि स्लायडिंग दरवाज्याच्या मधल्या छोट्या फटीतून त्याने पाय आत घातले. बिबट्या कपडा ओढत होता आणि त्या वेळी अनेक पर्यटकांनी त्या महिलेला सोडवण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओमध्ये दिसतं की कपड्याचा काही भाग फाटला आणि एका पर्यटकाने खिडकी बंद केली. चेन्नईहून कुटुंबासोबत आलेली ती महिला थोडी जखमी झाली आणि तिच्या हातातून रक्त येत होतं. घटनेच्या वेळी सफारी बसमध्ये डझनहून अधिक पर्यटक होते.
ही घटना बन्नेरघट्टा नॅशनल पार्कमध्ये पहिल्यांदाच घडलेली नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक बिबट्या सफारी वाहनावर चढण्याचा प्रयत्न करताना आणि खिडकीतून प्रवाशांकडे पाहताना दिसला होता. नंतर बिबट्या बसच्या वर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, पण ड्रायव्हरने वाहन पुढे चालवले. त्यामुळे बिबट्या पुन्हा आपल्या जंगलात परत गेला.
दरम्यान, हा व्हिडीओ @ElezabethKurian या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ७८.७k व्ह्युज आले आहेत. “बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील धक्कादायक व्हिडिओ; गुरुवारी दुपारी सफारी दरम्यान बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. बिबट्या सफारी व्हॅनच्या खिडकीवर चढला आणि तिचा हातावर ओरखडलं.”
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन इतकं मोठ-मोठ्याने का बोलताय पण”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तो एक भक्षक प्राणी आहे. तो त्याचा स्वभाव आहे. भीती निर्माण करणे थांबवा.” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “बिबट्या महिलेवर हल्ला करत नाहीये. मूर्ख महिलेला वन्य प्राण्यांशी कसे वागावे हे माहित नसते. गाईड अनेकदा लोकांना वागायला सांगतात. पण सेल्फी किंवा फोटोसाठी लोक मूर्खपणा करतात.”.
