तमिळनाडूच्या कोइम्बतूरमधील सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या उंच उडी मारून कोबंडीची शिकार करताना दिसत आहे. कोइम्बतूरच्या निवासी भागातील हा व्हिडीओ असल्याचे म्हटले जाते. निवासी भागात बिबट्याचा वावर दिसून आल्यानंतर वन विभागाने आता या भागात गस्त वाढवली आहे. विशेष म्हणजे या बिबट्याने उंच उडी मारून एका झटक्यात कोंबडीची शिकार केल्यामुळे सदर व्हिडीओला अनेकांची पसंती मिळत आहे.

बुधवारी (२९ मे) रोजी पहाटे ५ वाजता सदर घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कोइम्बतूरच्या सोमयानूर भागातील निवासस्थाजवळ बिबट्या दिसून आला. या परिसरात अनेकदा मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिसून आला आहे. या घटनेत बिबट्यात शिकार करण्याच्या उद्देशाने आल्याचे दिसून येते. घराच्या एका भिंतीवर कोंबडी बसलेली आहे. बिबट्या एका क्षणात भिंतीवर उडी घेत कोंबडीची शिकार करतो. ही भिंत किमान दहा फूट उंच असल्याचे सांगितले जाते.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे बिबट्या आस्तेकदम घराच्या आवारात प्रवेश करतो. समोरच्या भिंतीवर कोंबडी बसली असल्याचे लक्षात आल्यानंतर तो उडी घेतो. तेवढ्यात कोंबडी स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या बाजूला उडी घेते. मात्र तिथेही बिबट्या तिचा पिच्छा सोडत नाही. काही सेकंदात आपल्या तोंडात कोंबडीला धरून निवांतपणे बिबट्या चालत जाताना दिसून येतो.

हा व्हिडीओ स्थानिकांमध्ये व्हायरल झाल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही चित्रण पाहून लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोबंडीचे ओरडणे ऐकून बिबट्या याठिकाणी आला असावा आणि तिची शिकार केली असावी, असा अंदाज स्थानिक बांधत आहेत.

देशभरातील विविध राज्यांमध्ये वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष अनेकवेळा दिसून आलेला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि जंगलाला लागून असलेल्या शहरातही वारंवार बिबट्या दिसत असतो. नुकतेच मध्य प्रदेशमध्ये पहाटे शौचालयासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली, पण त्याने स्वतःला वाचविण्यात यश मिळवले. त्याने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यामुळे बिबट्याने त्याठिकाणाहून पळ काढला.