Unconscious Leopard Attack: वन्य जीवन माणसासाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिले आहे. दाट अरण्यात वावरणारे प्राणी त्यांच्या चपळाई, सामर्थ्य व धूर्तपणामुळे लक्ष वेधून घेतात. मात्र, हेच अरण्य कधी कधी धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून देणारी एक घटना अलीकडे समोर आली आहे. समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असलेल्या या ध्वनिचित्रफितीने अनेकांना हादरवून सोडले आहे. निसर्गातील कोणत्याही सजीवाला कमी लेखू नये, हा धडा ही घटना पुन्हा एकदा शिकवते.

अरण्य विभागाला एका भागात लोखंडी जाळ्यात अडकलेला बिबट्या आढळला. सुरुवातीला तो पूर्णपणे निश्चल पडल्याचे दिसत होते. त्यामुळे तो बेशुद्ध असावा, असा उपस्थितांचा समज झाला. त्यामुुळे परिसरात उभे असलेले अधिकारी आणि कर्मचारीही काहीसे निश्चिंत झाले. मात्र, ही शांतता क्षणिक ठरली.

त्या प्राण्याला थोडी मोकळीक मिळाली आणि त्याने क्षणात उडी घेत झेपावण्याचा प्रयत्न केला. ही घटना इतक्या झपाट्याने घडली की, तेथे उपस्थित अरण्य अधिकाऱ्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तत्काळ धाव घ्यावी लागली. ध्वनिचित्रफितीत स्पष्टपणे दिसते की, बिबट्या काही क्षणांपूर्वी पूर्णत: शांत पडलेला असताना अचानक अत्यंत आक्रमक बनतो.

घटनेदरम्यान तेथे एक श्वानही उपस्थित होता. सुरुवातीला तो बिबट्याकडे पुढे सरकताना दिसतो; परंतु मनुष्याला पळताना पाहून तोही घाबरून मागे हटतो. काही सेकंदांत घडलेला हा प्रसंग उपस्थितांच्या अंगावर काटा आणणारा ठरला.

ही ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावरील ‘एक्स’ या व्यासपीठावर एका खात्याद्वारे प्रसारित करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या. काहींनी अधिकाऱ्याच्या चपळाईचे कौतुक केले; तर काहींनी ही घटना वन्य प्राण्यांच्या स्वभावाची आठवण करून देणारी असल्याचे नमूद केले. बिबट्यासारखे शिकारी प्राणी सामान्य परिस्थितीत मनुष्यांपासून दूर राहणे पसंत करतात; परंतु जखमी अवस्थेत किंवा सापळ्यात अडकल्यास ते अधिक आक्रमक होऊ शकतात, असे जाणकार सांगतात.

ही घटना स्पष्ट संदेश देते की, अरण्यातील प्रत्येक सजीव सतत सजग असतो. त्याच्या हालचाली क्षणात बदलू शकतात. म्हणूनच वन क्षेत्रात काम करताना किंवा भ्रमंती करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जंगलात माणूस हा पाहुणा असतो; तेथील नियम वेगळे असतात. एका क्षणाचा निष्काळजीपणाही गंभीर परिणाम घडवू शकतो.

बेशुद्ध वाटलेला बिबट्या अचानक झेपावल्याची ही घटना केवळ थरारक नाही, तर वन्य जीवनाबाबत जागरूक राहण्याचा इशाराही देणारी ठरते.

येथे पाहा व्हिडीओ