Leopard Spotted in the hospital basement video viral: सध्या जंगलतोड किंवा अन्य कारणांमुळे अनेकदा काही गावांमध्ये, रस्त्यांवर बिबट्यांचा वावर दिसतो. वस्तीत अचानक बिबट्या शिरल्याने रहिवाशांची पळता भुई थोडी होते. बिबट्याच्या अशा दहशतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. आता असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय, जिथे बिबट्या कोणत्या वस्तीत नाही तर थेट रुग्णालयात शिरला आहे.
शनिवारी सकाळी घडलेल्या एका भयानक घटनेने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. राजस्थानमधील चोमू शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या तळघरात बिबट्या शिरला. रुग्णालयाचे तळघर, ज्यात बेड, बाईक आणि इतर उपकरणं ठेवलेली होती, तिथे बिबट्या अनपेक्षितपणे लपला होता. बिबट्या रुग्णालयात शिरल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. या फुटेजमुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली आहे.
माहितीनुसार, जयपूर रोडवरील राजस्थान नर्सिंग हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तळघरात बिबट्या दिसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे २ च्या सुमारास बिबट्या तळघरात शिरल्याचे समोर आले. फुटेज पाहताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. सकाळी ९ वाजेपर्यंत जयपूर येथील वन विभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी टीम फटाक्यांचा वापर करीत आहे. रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये दाट व काटेरी झुडपे असल्याने बिबट्या तेथे लपून बसला असावा, असा संशय आहे.
चोमू पोलीसदेखील घटनास्थळी उपस्थित झाले होते. बिबट्याच्या उपस्थितीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने रुग्ण व त्यांचे कुटुंबीय घाबरले आहेत. जयपूर रोड येथे हे रुग्णालय आहे, तसेच तेथे अनेक रुग्णालये आणि शाळाही आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने चार वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याशिवाय रुग्णालयाच्या पाठीमागील रिकाम्या प्लॉटमधील काटेरी झुडपे जेसीबी मशीनच्या साह्याने साफ करण्यात येत असून, बचावकार्य सुलभ करण्यात येत आहे.
दरम्यान, परिस्थिती सध्या कायम असून, बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्याचे आणि त्यास हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अजू बिबट्याला जेरबंद केल्याचे आणि सुटका केल्याचे कोणतेही वृत्त नाही.