Leopard Suddenly Attacks Delivery Boy on Empty Road: रात्रीचा निर्मनुष्य रस्ता… कामावर निघालेला एक डिलिव्हरी बॉय शांतपणे दुचाकी चालवत पुढे जात असतो. अचानक त्याच्या समोर अशी एक आकृती उभी राहते की, क्षणभर त्याचाही श्वास रोखला जातो… पुढच्या काही सेकंदांत घडलेली घटना पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

समोर बिबट्या… आणि काही क्षण दोघेही जागच्या जागी

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय ओसाड रस्त्याच्या मार्गे दुचाकीवरून जाताना दिसतो. अचानक त्याच्या समोरून एक बिबट्या चालत येताना दिसतो. समोर बिबट्या दिसताच युवक तत्काळ दुचाकी थांबवतो. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत उभे राहतात.

क्षणभर काय करावं, हेच दोघांनाही सुचत नसल्याचं दृश्य पाहायला मिळतं. मात्र, पुढच्याच क्षणी परिस्थिती पूर्णपणे बदलते.

बिबट्याने अचानक धाव घेतली

काही सेकंद शांत उभा असलेला बिबट्या अचानक वेगाने डिलिव्हरी बॉयच्या दिशेने धाव घेतो. समोर मृत्यू उभा असल्याची जाणीव होताच युवकाने क्षणाचाही विलंब न करता दुचाकी तिथेच सोडली आणि जीवाच्या आकांताने तो धावत सुटला.

युवकाच्या या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडते की, पाहणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकतो.

सीसीटीव्हीत कैद झाला थरार

रस्त्यालगत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच लाखो लोकांनी तो पाहिला असून, अनेकांनी डिलिव्हरी बॉयच्या धाडसासह प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.

वन विभागाचे शोध अभियान

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, त्या वेळी बिबट्या सापडला नाही.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्या पुन्हा दिसताच त्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येईल. नागरिकांनीही अशा परिस्थितीत घाबरून न जाता, त्यासंबंधीची माहिती तातडीने वन विभागाला द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी डिलिव्हरी बॉयच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, “फक्त एका सेकंदाचा उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.” दुसऱ्याने म्हटले, “त्याच्या हुशारीमुळेच त्याचा जीव वाचला.”

काहींनी वाढत्या मानवी वसाहतींमुळे वन्य प्राणी रहिवासी भागात येत असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. तर काहींनी “आता डिलिव्हरी करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे,” असे म्हटले.

येथे पाहा व्हिडीओ

शेवटी जाणून घ्या… हा थरार नेमका कुठे घडला?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडल्याचं सांगितलं जात आहे. रात्री डिलिव्हरीसाठी निघालेल्या एका युवकासमोर अचानक बिबट्या आला आणि काही क्षणांतच हा थरार उभा राहिला. सुदैवाने युवकाने योग्य वेळी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्याचा जीव वाचला. आता हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावराबाबतही चर्चा रंगू लागली आहे.