Leopard Seizure Video: जंगलातून भरकटत मानवी वस्तीत आलेल्या एका बिबट्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहताना सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटतं; मात्र काही क्षणांतच बिबट्याच्या शरीरात अचानक तीव्र हालचाल सुरू होते आणि तो नियंत्रण गमावून झुडपांमध्ये कोसळतो. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, तर सोशल मीडियावर या घटनेमागचं कारण काय असावं, याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये बिबट्या झुडपं आणि दगडांच्या मधोमध जमिनीवर शांतपणे बसलेला दिसतो. आजूबाजूला काही ग्रामस्थ सुरक्षित अंतरावर उभे राहून, त्याचा व्हिडीओ चित्रित करीत असतात. सुरुवातीला बिबट्या जवळपास कोणतीही हालचाल करीत नाही. त्यामुळे तो थकलेला आहे की जखमी, असा प्रश्न अनेकांना पडतो.

मात्र, काही क्षणांतच संपूर्ण चित्र बदलतं. अचानक बिबट्याच्या शरीरात जोरदार थरथर सुरू होते. त्याचं डोकं आणि शरीर अनियंत्रितपणे हलू लागतं. काही क्षणांत तो तोल जाऊन झुडपांमध्ये कोसळतो. खाली पडल्यानंतरही त्याच्या शरीरात तीव्र कंपनं सुरूच असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. व्हिडीओच्या शेवटपर्यंत बिबट्याची ही अवस्था कायम राहते आणि त्यानंतर चित्रफीत संपते.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. काही जणांनी बिबट्याला अपस्माराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींच्या मते, त्याला विषारी साप चावला असावा. काहींनी विषबाधेची शक्यता व्यक्त केली; तर काहींनी वन्य प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या Canine Distemper Virus या आजाराचाही उल्लेख केला. मात्र, या सर्व चर्चा म्हणजे केवळ सोशल मीडियावरील प्रतिक्रिया असून, त्याला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

व्हायरल पोस्टनुसार ही घटना नेपाळमधील अछाम जिल्ह्यातील मेल्लेख-५ येथील रावतबाडा परिसरातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरील sushilkhadka1 या खात्यावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये नेपाळी भाषेत लिहिलेल्या माहितीनुसार, हा बिबट्या एका घराच्या छतावर आढळून आला होता. त्यावेळी तो आजारी असल्याचं दिसत होतं आणि त्याच्यामध्ये अपस्मारासारखी लक्षणं दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याच पोस्टमध्ये स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वन विभाग आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून, बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी हलवावं, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हजारो नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी वन विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. काहींनी बिबट्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली; तर काहींनी पुढे त्याचं काय झालं, त्याला वाचवण्यात यश आलं का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बिबट्याला खरोखर अपस्माराचा झटका आला होता का, तो एखाद्या विषारी प्राण्याच्या दंशामुळे त्रस्त झाला होता का की, अन्य कोणत्या आजाराचा दुष्परिणाम त्याच्यावर झाला होता, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे.

येथे पाहा व्हिडीओ

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्हिडीओवरून प्राण्याला कोणता आजार झाला आहे किंवा त्याच्या वर्तनामागचं नेमकं कारण काय आहे, याचा निष्कर्ष काढणं शक्य नसतं. त्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि वन विभागाचा अधिकृत अहवाल आवश्यक असतो. त्यामुळे या व्हिडीओतील बिबट्याच्या अवस्थेबाबत सध्या निश्चित काहीही सांगता येत नाही. मात्र, या घटनेने सोशल मीडियावर मोठी उत्सुकता आणि चिंता निर्माण केली आहे.