Man Living In Store Room For 7 Years : खिशात पैसे नसतील, तर माणूस कोणत्याही परिस्थितीत आयुष्य काढायला तयार होतो. असाच एक तरुण अनेक वर्षांपासून एका अत्यंत लहान झोपडीसारख्या घरात राहत आहे. तिथेच त्याने आपले छोटेसे विश्व उभे केले आहे आणि त्यामध्ये तो कसेबसे आयुष्य रेटत आहे. त्याचा खर्चही फारसा नाही; पण त्याचा हा भावनिक व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे नक्की पाणावतील.
डोक्यावर हक्काचे छत असावे; मग ते कसेही का असेना, असे प्रत्येक गरिबाला वाटत असते. अशा कठीण परिस्थितीत तो माणूस पोटाला चिमटे काढून आला दिवस कसातरी ढकलत असतो. काहींना यश मिळते काहींना नाही, एका तरुणाने हाच विचार आपल्यासमोर जिवंत केला आहे. तो इतक्या लहान घरात राहतोय की, त्याला घर किंवा खोली म्हणणेही चुकीचे ठरेल. ही एक अगदी छोटीशी झोपडी आहे, जी सहसा लोक सामान ठेवण्यासाठी (स्टोअर रूम म्हणून) वापरतात; पण हा तरुण मात्र तिथेच राहतो.
७ वर्षे आणि ५०० रुपये भाडे
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही जागा प्रत्यक्षात इतकी छोटी आहे की, काही लोक तर आपले हातही पूर्णपणे पसरू शकणार नाहीत. परंतु, पैशांच्या कमतरतेमुळे हा तरुण तिथे राहत आहे. विशेष म्हणजे तो दरमहा घरमालकाला ५०० रुपये भाडेही देतो.
छतावरून पाणी गळतेय
व्हिडीओच्या सुरुवातीला हा तरुण छतावरून पाणी गळत असल्याच्या समस्येबद्दल बोलताना दिसतो. तो घरमालकाला सांगत असतो की, खोलीत गळतीमुळे वेगवेगळ्या जागेवरून पाणी पडत आहे.
फक्त पैशांची बचत करण्यासाठी…
‘Ulti.baat.only.bakwas’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये तो तरुण अतिशय कष्टाने त्या छोट्या खोलीत स्वतःला अॅडजस्ट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सांगण्यात आले की, तो फक्त पैशांची बचत करण्यासाठी (कमी भाड्याच्या नादात) येथे राहत आहे.
’12th Fail’ चित्रपटाची आली आठवण
गाजलेल्या ’12th Fail’ या चित्रपटात विक्रांत मसीची भूमिका अशाच प्रकारच्या बिकट परिस्थितीत राहून अभ्यास करताना दिसते. हा व्हिडीओ पाहून एका युजरला त्या चित्रपटाची आठवण आली. एका युजरने म्हटले आहे, “गरिबी माणसाकडून काहीही करून घेऊ शकते.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “परिस्थितीनुसार मला तर ही लहानशी खोलीही स्वर्गासारखी वाटत आहे.”
