Shocking Video Viral: आईची जागा या जगात दुसरं-तिसरं कोणी घेऊ शकत नाही. पोटच्या पोरासाठी ती कोणतीही गोष्ट तळमळीने करते. वेळ आली, तर स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही ती मागे-पुढे पाहत नाही. एक वेळ ती स्वत: उपाशी राहील; पण लेकराचं पोट भरल्यावरच तिचा तिला समाधान लाभतं. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात चिमुकल्याची तहान भागविण्यासाठी तिचा चाललेला जीवघेणा आटापिटा पाहून तुमचेही डोळे आसवांनी डबडबल्याशिवाय राहणार नाहीत.

व्हिडीओबाबत असे सांगितले जात आहे की, एक आई आपल्या चिमुकल्याला तहान लागली म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरली खरी; पण ती पाण्याची बाटली भरून परतत नाही तोवर ट्रेन नेमकी सुटली. मग तान्हुल्याच्या ओढीनं कासावीस झालेली ती माता चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या घाई-गडबडीत ती प्लॅटफॉर्मवर दोनदा पडली; पण तरीही तिनं हार मानली नाही. धडपडत ती पुन्हा पुन्हा उठली; परंतु ती धावत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत राहिली. ही एका आईची दाटून आलेली भावना आहे, जी आपल्या मुलासाठी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालायलाही तयार होते.

… अन् मृत्यूच्या दारात जाण्याआधीच थोडक्यात बचावली

दिल्ली- आग्रा मार्गावरील हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्यात एक महिला हातात पिशवी आणि पाण्याची बाटली घेऊन चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असते. पहिल्या प्रयत्नात ती हँडल पकडताच, तिचा तोल सुटतो आणि ती जोरात प्लॅटफॉर्मवर पडते; पण ती पुन्हा उठून चढण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिच्या पायाला दुखापतही झाली होती; पण चिमुकल्यासाठी ती आपला जीव धोक्यात घालत असते. अशा प्रकारे दोनदा नाही, तर तीन वेळा ती खाली कोसळते; पण मृत्यूच्या दारात जाण्याआधीच थोडक्यात बचावते. सुदैवानं ती महिला तोल जाऊन रुळावर पडून गाडीच्या खाली आली नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. अखेर चौथ्या प्रयत्नात तिला गाडीत चढण्यात यश मिळते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. काही जण महिलेचं जीवघेणं धाडस पाहून आश्चर्यचकित झाले, तर बहुतेकांनी तिच्यावर टीका केली. एका संतप्त युजरनं कमेंट केली की, भारतात जीवन स्वस्त आहे. हे केवळ सरकारच्या दृष्टीनंच नाही, तर नागरिकांच्या दृष्टीनंही आहे. दुसऱ्यानं म्हटलं, या महिलेला शौर्य पुरस्कार द्या, भाऊ. तिसऱ्या युजरनं म्हटलं की, प्रयत्न करणारे कधीही हार मानत नाहीत, हे तिनं जास्तच मनावर घेतलं आहे.