Lion Attack Video : प्राणिसंग्रहालयातील विविध प्राणी, पक्षी बघण्याची सर्वांनाच आवड असते; त्यामुळे लोक आपल्या मुलांना घेऊन वीकेंडला या ठिकाणी गर्दी करताना दिसतात. यावेळी विविध प्राणी पाहण्याचा मुलांचा उत्साह हा काही औरचं असतो. याच उत्साहात एक चिमुकली तिच्या आईसह प्राणिसंग्रहालयात गेली होती. यावेळी सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जाताच तिच्याबरोबर असं काही घडलं की तुम्ही विचार करू शकणार नाहीत.
चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शांटोउ झोंगशान पार्क प्राणिसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे, ज्यात एक १० वर्षांची मुलगी सिंहाच्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ उभी राहून त्यांना पाहत असते. यावेळी एका सिंहिणीने पिंजऱ्याच्या जाळीतून पंजा बाहेर काढून मुलीचा पाय धरला आणि ताकदीने खेचू लागली, हे दृश्य पाहून अनेकांनी धक्का बसला.
सिंहीणीने पिंजऱ्यातून पंजा बाहेर काढत केला हल्ला
व्हिडीओत पाहू शकता की, एक लहान मुलगी तिच्या आईसह सिंहांच्या पिंजऱ्याजवळ जाते. जवळ जाताच कळपातील एक सिंहिण पुढे येऊन क्षणात पिंजऱ्यातून पंजा बाहेर काढते आणि त्या मुलीचा पाय पकडून ठेवते. ती सिंहिण इतकी चिडलेली दिसतेय की ती त्या मुलीला क्षणात भक्षक बनवू शकली असती, कारण पूर्ण ताकदीने ती मुलीला खेचण्याचा प्रयत्न करत होती, पण प्राणीसंग्रहालयातील सुरक्षा रक्षक मोठ्या शिताफीने सिंहिणीपासून मुलीचा बचाव करतात आणि तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात. यावेळी सुरक्षा रक्षकानेही आपले प्राण धोक्यात घातले.
या घटनेवेळी मुलगी घाबरली आणि ती मोठ्याने रडू लागली. त्यावेळी तेथे इतर दोन लोक उपस्थित होते, परंतु त्यापैकी कोणीही सिंहिणीच्या तावडीतून मुलीला सोडवण्याची हिंमत केली नाही.
सिंहिणीच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ @yaaronloop या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या घटनेवर आता लोक सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर काहींनी पालकांचा हा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, ते किती मूर्ख आहेत! पालक मुलीला तिथे घेऊन गेले तेव्हा काय विचार करत होते? दुसऱ्याने म्हटले की, ज्या पद्धतीने सिंहिणीने मुलीला पकडले त्यामुळे काहीही होऊ शकले असते. तिसऱ्याने लिहिले की, येथे पालकांची स्पष्ट चूक आहे.
