विविध खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा असतात. या मैदानी खेळांमध्ये स्पर्धेत जिंकल्यावर पारितोषिक किंवा ट्रॉफी दिल्या जातात. हे बक्षीस म्हणून देण्यात आलेले पैसे अनेकदा आपण आठवण म्हणून स्वतःजवळ ठेवतो किंवा स्वतःसाठी एखादी खास वस्तू खरेदी करतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक पोस्ट वेगळेच काही सांगत आहे. एका चिमुकल्याने स्पर्धेतील बक्षिसांच्या पैशातून एका खास व्यक्तीस गिफ्ट दिले आहे; जे पाहून तुम्हीही काही क्षणासाठी नक्कीच भावूक व्हाल.
अंकित नावाच्या एका चिमुकल्याला बॅडमिंटन स्पर्धेत सात हजार रुपये बक्षीस देण्यात आले. पण, या बक्षिसातून मिळालेल्या रकमेचा गैरवापर किंवा स्वतःवर खर्च करण्याऐवजी चिमुकल्याने अगदीच खास गोष्ट केली आहे. अंकितने बक्षिसाच्या पैशातून त्यांच्या घरी स्वयंपाक बनवण्याचे काम करणाऱ्या महिलेला मोबाइल गिफ्ट म्हणून दिला आहे. चिमुकल्याने स्वतःसाठी चॉकलेट किंवा खेळणी न घेता, त्याला लहानपणापासून सांभाळणाऱ्या, घरकाम करणाऱ्या महिलेला खास भेटवस्तू दिली आहे; जी अगदीच कौतुकास्पद आहे.
हेही वाचा…विमानातील अनाऊन्समेंटची ही नवी पध्दत तुम्ही कधी पाहिली आहे काय? पाहा Video…
पोस्ट नक्की बघा :
तसेच अंकितच्या वडिलांनी @V.Balaji यांनी एक खास पोस्ट शेअर करीत लिहिले की,अंकितला बॅडमिंटन स्पर्धेत सात हजार रुपये बक्षीस देण्यात आले आणि आज त्याने आमच्या घरी जेवण करणाऱ्या सरोजा यांना जिंकलेल्या रकमेतून दोन हजार रुपयांचा फोन घेऊन दिला आहे. अंकित सहा महिन्यांचा असल्यापासून सरोजा त्याची नेहमी काळजी घेतात. अंकितचे पालक म्हणून माझी पत्नी @meerabalaji3107 आणि मी यापेक्षा जास्त खूश होऊ शकत नाही, अशी भावूक कॅप्शन त्यांनी या पोस्टवर लिहिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @cricketbalaji1 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच खास कॅप्शन लिहून चिमुकला अंकित आणि घरकाम करणाऱ्या महिलेला फोन भेटवस्तू देतानाचा एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी कमेंटमध्ये अंकित या चिमुकल्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
