Little Girl Lavni Dance Video : सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही डान्स व्हिडीओ फार मजेशीर तर काही खरंच कौतुकास्पद असतात. सध्या एका चिमुकलीचा असाच एक जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली अशी काय फक्कड लावणी सादर करते की पाहणारेही चकित झाले. एका अनुभवी लावणी क्वीनसारखी ती स्टेजवर नाचतेय.
लावणी महाराष्ट्राची लोककला आहे, ती अनेकजण तितक्याच प्रेमाने जपतात. या चिमुकलीनेही अशी काही लावणी सादर केली की वातावरणचं एकदम बदलून गेले. इतक्या लहान वयात ती लावणीची प्रत्येक स्टेप एकदम परफेक्ट करतेय ते पाहून प्रेक्षकही तिच्या लावणीच्या प्रेमात पडले आहेत. चिमुकलीने दिलखेचक अदाकारी करत सुंदर लावणी सादर केली, तिच्या या लावणीपुढे गौतमी पाटील देखील फेल आहे.
व्हिडीओत चिमुकली ‘नटरंग’ या मराठी चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यावर लावणी सादर करताना दिसतेय. लावणीच्या बोलाप्रमाणे तिच्या स्टेप्सही तितक्याच ठसकेबाज आहेत. तिचे हावभावदेखील घायाळ करणारे आहेत. नऊवारी साडी, त्यावर मराठमोळा साजश्रृंगार असा पेहराव तिने केलाय. तिच्या डान्स स्टेप्स आणि नखरेल अदाकारी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय, कारण इतक्या लहान वयात एवढ्या कमालीचे हावभाव करणं प्रत्येकाला जमण्यासारखं नाही.
चिमुकलीचा हा जबरदस्त लावणी व्हिडीओ atra6196 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ही झाली मराठ्यांची शान लावणी. दुसऱ्याने लिहिले की, अप्रतिम, खूप खूप छान लावणी बाळा. तिसऱ्याने लिहिले की, खूप खूप छान, बाळा, कुठेच नाव ठेवायला जागा नाही, खूप छान डान्स केलास.
