Vithucha Gajar Harinamacha Dance :विठूराया हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. भक्ती आणि एकतेचे प्रतीक असलेली वारीची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. लाखो वारकरी पालखीसोबत पंढरीकडे लाडक्या विठूरायाच्या भेटीस निघाले आहेत. डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन अन् हातात टाळ-चिपळ्या घेऊन वारकरी सतत विठूनामाचा गजर करतात. गाव-शहरांमध्ये रहिवासी पालख्यांचे भक्तिभावाने स्वागत करतात.

भक्तिमय वातावरणात नवी पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होण्याचा प्रयत्न करताना दिसते. काही लोक विठ्ठलाची भक्तिगीते गाताना दिसतात, तर काहीजण त्या गाण्यांवर थिरकताना दिसतात. सध्या अशाच काही चिमुकल्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

विठूचा गजर गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या ( Little Girl Vithucha Gajar Song Dance)

“विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला!…”

हे गाणे आषाढी वारी सुरू झाल्यापासून आपल्यापैकी अनेकांच्या कानावर पडले असेल. याआधीही अनेकांनी हे गाणे ऐकले असेल, गायले असेल आणि अनेकांनी या गाण्यावर ठेकाही धरला असेल. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अशाच काही चिमुकल्यांचा आहे. ‘विठूचा गजर…’ या गाण्यावर या मुलींनी ठेका धरला आहे, तोही अगदी पारंपरिक वेषभूषा परिधान करून! या मुलींनी लाल आणि हिरव्या रंगाचे परकर-पोलके परिधान केले आहे आणि दोन वेण्या घातल्या आहेत. त्यांचा हा पेहराव पाहून अनेकांना मुक्ताईची आठवण होत आहे. गाण्याच्या प्रत्येक बोलावर आणि तालावर या चिमुकल्या थिरकत आहेत. चिमुकल्यांचे हे नृत्य पाहून उत्साह आपोआप वाढतो.

व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला (Netizens liked the video)

‘rising_star_dance_academy’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना “॥ विठूचा गजर ॥” एवढेच कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ जवळपास दोन लाख सहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी “खूप सुंदर”, “उत्कृष्ट”, “खूप मस्त”, “अप्रतिम”, “गोड”, “खूप छान”, “नादखुळा” अशा कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी “व्हिडीओ पाहून मन प्रसन्न झाले”, “राम कृष्ण हरी” अशा कमेंट्स केल्या आहेत. एकाने व्हिडीओवर कमेंट केली की, “अप्रतिम, सर्व मुक्ताई!”, तर दुसऱ्याने कमेंट केली की, “गोड दिसतायेत सर्व रुक्मिणी.” एकाने तर असेही लिहिले आहे की, “दहा वेळा पाहिले तरी मन नाही भरलं.”