Why Do Trains Run Late Loco Pilot Viral Video Leaves Passengers Shocked: भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र, रेल्वे उशिरा धावणं हा अनेक प्रवाशांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो. स्टेशनवर तासन् तास वाट पाहताना अनेक जण थेट लोको पायलटलाच दोष देतात. “ड्रायव्हरमुळे ट्रेन लेट झाली”, असं बोललं जातं. पण, खरंच प्रत्येक वेळी लोको पायलटच जबाबदार असतो का?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे या चर्चेला नवं वळण मिळालं आहे. एका लोको पायलटनं स्वतः व्हिडीओ बनवीत रेल्वे उशिरा का धावतात यामागचं खरं कारण सांगितलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
लाल सिग्नलमुळे थांबलेली रेल्वे
व्हायरल व्हिडीओमध्ये एक लोको पायलट रेल्वेच्या इंजिनमध्ये उभा राहून प्रवाशांना परिस्थिती समजावून सांगताना दिसतो. तो सांगतो की, अनेकदा लोकांना वाटतं रेल्वे उशिरा होण्यामागे लोको पायलटची चूक असते; पण वास्तव वेगळंच असतं.
व्हिडीओमध्ये तो दाखवतो की, ट्रेन सुरू करण्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे; मात्र समोरचा सिग्नल लाल असल्यामुळे ट्रेनला थांबावं लागत आहे. “जोपर्यंत सिग्नल हिरवा होत नाही, तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत नाही,” असं तो स्पष्टपणे सांगतो.
इतक्यात दुसरी एक एक्स्प्रेस वेगाने पुढे जाते. त्यावर लोको पायलट सांगतो, “ही आमच्यापेक्षा महत्त्वाची एक्स्प्रेस आहे. त्यामुळे तिला आधी मार्ग दिला जातो आणि आम्हाला थांबवलं जातं.”
दोन तासांत फक्त ३० किलोमीटर प्रवास!
व्हिडीओमध्ये लोको पायलट पुढे एक धक्कादायक माहिती देतो. तो म्हणतो, “रेल्वेला सुरू होऊन दोन तास झाले आहेत; पण सतत पासिंग आणि सिग्नलमुळे आम्ही इतक्या वेळा थांबलो की, फक्त ३० किलोमीटरच अंतर पार करू शकलो.”
ही परिस्थिती पाहून अनेकांना रेल्वे व्यवस्थेतील अडचणींची कल्पना आली. लोको पायलटच्या म्हणण्यानुसार, रेल्वे उशिरा धावण्यामागे केवळ चालक जबाबदार नसतो; तर सिग्नल व्यवस्था, ट्रॅकवरील रेल्व्यांची संख्या आणि ऑपरेशन कंट्रोल यांचाही मोठा संबंध असतो.
मग नेमकं जबाबदार कोण?
लोको पायलटच्या मते, कोणती रेल्वे आधी सोडायची, कोणती थांबवायची, कोणत्या रेल्वेला प्राधान्य द्यायचं हे सर्व निर्णय नियंत्रण कक्षातून घेतले जातात. स्टेशन मास्टरलादेखील त्यानुसार सूचना दिल्या जातात.
तो पुढे म्हणतो, “आम्हालादेखील लवकर घरी जायचं असतं; पण ट्रेन उशिरा झाल्यामुळे अनेकदा रात्री उशिरा, अगदी १-२ वाजता घरी पोहोचावं लागतं.”
त्याच्या या विधानामुळे अनेक लोक भावूक झाले आहेत. कारण- प्रवासी ज्या व्यक्तीला दोष देतात, ती व्यक्तीही अनेकदा परिस्थितीमुळे त्रस्त असते, हे या व्हिडीओमधून स्पष्ट होतं.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला असून, कमेंट्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
एका युजरनं लिहिलं, “आज इतकं मोठं सत्य समोर आलं.” तर दुसऱ्यानं मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, “ओव्हरटाईमचे पैसे मिळत असतील ना?” काहींनी लोको पायलटच्या संयमाचं कौतुक केलं; तर काहींनी रेल्वे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
येथे पाहा व्हिडीओ
सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार चर्चेत असून, रेल्वे उशिरा धावण्यामागचं वास्तव लोकांसमोर आणणारा महत्त्वाचा व्हिडीओ म्हणून पाहिला जात आहे.
