देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यात देशातील विविध राज्यांमध्ये १०२ जागांसाठी मतदान झाले. यानंतर आता निवडणुकीचे आणखी ६ टप्पे शिल्लक आहेत. यात १९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. यात बहुतांश उमेदवारांप्रमाणे आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याचदरम्यान सोलापुरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदें यांचा प्रचार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण चकित झाले.

सोलापूरातील व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी खरचं शाहरुख खान स्वत: प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आला होता असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु हा व्हिडीओ नीट पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल, प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत असलेली ती व्यक्ती शाहरूख खानचा डुप्लिकेट आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काँग्रेसचे काही कार्यकर्ते सोलापूरातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे. यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते खास प्रचारासाठी सजवलेल्या टेम्पोवर स्वार होऊन प्रचार करताय. यावेळी त्यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे, जी हुबेहुब अभिनेता शाहरुख खानसारखी दिसतेय. पण कॅमेरा त्या व्यक्तीवर झूम होताच लक्षात येते की, ती व्यक्ती शाहरुख खानची डुप्लिकेट आहे. त्याची हेअरस्टाईल, कपडे, लूक, हावभाव अगदी शाहरुख खानसारखे आहेत. सोलापुरात प्रचारासाठी आलेल्या या डुप्लिकेट शाहरुखला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

पाहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) @KreatelyMedia नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना, ‘काँग्रेसने आपल्या प्रचारासाठी डुप्लिकेट शाहरुख खानला नियुक्त केले ‘ असे कॅप्शन लिहिले आहे. या व्हिडीओवर युजर्स आता अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत.