एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही मोफत वस्तू वाटण्यात येत असेल तर त्याठिकाणी नागरिकांची एकच झुंबड उडते. अलीगढमध्येही नुकतेच हे दृश्य पहायला मिळाले. मात्र ही गर्दी कोणती वस्तू घेण्यासाठी झाली होती ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
डस्टबिन घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कृष्णांजली सभागृहात एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रशासनातर्फे डस्टबिन वाटण्यात येणार होते. मुख्यमंत्री याठिकाणी उशीरा आल्याने कार्यक्रम काहीसा उशीरा सुरु झाला. मुख्यमंत्री आणि इतर अधिकारी कार्यक्रम स्थाळवरुन बाहेर गेल्यानंतर मात्र उपस्थितांनी हे डस्टबिन घेण्यासाठी एकच गोंधळ केला. एकच गोंधळ झाल्याने नेमके काय करावे हे याठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनाही कळाले नाही.
लोकांनी शक्य तितके डस्टबिन याठिकाणहून पळवून नेले, कोणी ५, कोणी १० तर कोणी १५ असे हातात मावतील तेवढे डस्टबिन लोकांनी या ठिकाणहून पळवले. यामध्ये अबालवृद्धांसह तरुण आणि स्त्रियांचाही समावेश होता.