सुप्रसिद्ध कंपन्या, ब्रॅण्ड्स त्यांच्या उत्पादनांसोबत त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांसाठीसुद्धा विशेष प्रसिद्ध असतात. अशा वेगवेगळ्या आणि भन्नाट उत्पादनांच्या किमती नुसत्या ऐकल्या तरीही मनात धडकी भरल्यासारखे होते. मध्यंतरी डॉल्से आणि गब्बाना [Dolce & Gabbana] या ब्रॅण्डची ‘खाकी स्की मास्क कॅप’ ३२ हजारांना मिळत होती; तर ह्युगो बॉस [Hugo Boss] या ब्रॅण्डच्या चपला नऊ हजारांना मिळत होत्या. आता या सगळ्यानंतर फ्रान्समधील लुईस व्हिटोन [Louis Vuitton] या सुप्रसिद्ध फॅशन ब्रॅण्डने वेगळ्याच पद्धतीचे बूट बाजारात आणले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बुटांमध्ये वेगळेपण किंवा विचित्रपणा काय आहे? तर, हे गुडघ्यापर्यंत येणारे आणि काहीसे सैलसर असे बूट एखाद्या मानवी पायांप्रमाणे दिसणारे आहेत. हे एखाद्या महिलेने पायांत मोजे आणि काळ्या रंगाच्या टाचेच्या चपला घातल्यावर जसे दिसतील तसे रंगवण्यात आले आहेत. या बुटांची किंमत जवळपास दोन लाख इतकी असून, ते दोन रांगांमध्ये उपलब्ध आहेत.

इसाबेल आलेन [Isabelle Allain] हिने या बुटांबद्दल आपल्या इन्स्टाग्रामवरील @izzipoopi या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. “हे मानवी पायांसारखे दिसणारे बूट साधारण वर्षभरापूर्वी मी एका रनवेवर पाहिले होते आणि तेव्हा मला अंदाज आला होता की, हे बूट नक्कीच बाजारात विक्रीसाठी येतील,” असे ती या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

हेही वाचा : मानव नसूनही मॉडेलिंग करते ‘ही’ इन्फ्ल्यूएंसर! महिन्याला नऊ लाख कमवणारी ही मॉडेल आहे तरी कोण पाहा…

बुटांबद्दल माहिती देणाऱ्या या व्हिडीओला लाखभराहून अधिक जास्त व्ह्युज मिळाले आहेत. आता या भन्नाट व आगळ्यावेगळ्या बुटांचा व्हिडीओ बघून, त्यावर अनेक प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. काहींच्या मते हे अतिशय फालतू बूट्स आहेत; तर या बुटांमध्ये अजून रंग असतील, तर नक्कीच विकत घेता येऊ शकतात.

अशा मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतील.

पाहा या व्हिडीओवर आलेल्या काही कमेंट्स

“जेव्हा पहिल्यांदा हे बूट पाहिले तेव्हा ते बघून अतिशय किळसवाणे वाटलं; पण आता ते घ्यायची इच्छा होत आहे,” असे एकाने लिहिले आहे. तर दुसऱ्याने, “मला वाटलं नव्हतं; पण हे बूट मला फारच आवडले आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली. तिसऱ्याने “तुम्ही छान आहात; पण ते बूट फारच घाण आहेत,” अशी कमेंट केली. चौथ्याने, “मान्य आहेत की हे बूट्स फारच विचित्र आहेत; पण मला ते फारच पसंत पडले आहेत,” असे म्हटले आहे. शेवटी एका नेटकऱ्याने, “यामध्ये जर अजून रंग असतील, तर मी नक्कीच विकत घेईन,” असे लिहिले आहे.

एनडीटीव्हीच्या [NDTV] एका लेखातील माहितीनुसार असे समजते की, या बुटांना ‘इल्युजन हाय बूट्स’ असे म्हटले जात असून, हे लुईस व्हिटोनच्या २०२३ च्या हिवाळी फॅशन शोचा एक महत्त्वाचा भाग होते. या बुटावरील पोटऱ्या, मोजे सर्व काही अगदी खरे वाटावे यासाठी ते हाताने रंगवले गेले आहेत. त्यासोबतच काळ्या चपलांवर LS म्हणजेच लुईस व्हिटोन या ब्रॅण्डची अक्षरेदेखील कोरलेली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Louis vuitton illusion high boots that look like human leg costs around 2 lakh watch viral video dha
First published on: 04-12-2023 at 13:27 IST