कॉर्पोरेट जगतात अनेक वेळा निष्ठा दाखवणाऱ्यांना गोष्टीचा योग्य मोबदला मिळतो. असेच काहीसं उदाहरण Kissflow Inc या आयटी कंपनीने सर्वांना दिले आहे. कंपनीने आपल्या पाच निष्ठावंत कर्मचाऱ्यांना महागडी बीएमडब्ल्यू कार भेट दिल्या आहेत. करोना काळातील कठीण परिस्थितीतही कंपनीला पाठिंबा दिल्याबद्दल बक्षीस दिले आहे. एका गाडीची किंमत १ कोटीच्या घरात आहे. कार पुरस्कार सोहळ्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती आणि पुरस्कार विजेत्यांना या आलिशान कार देणार असल्याची माहिती काही तास आधी देण्यात आली.

कंपनीचे सीईओ सुरेश संबंदम यांनी कर्मचाऱ्यांना चावी सुपूर्द केल्यानंतर सांगितले की, “ही पाच लोकं प्रतिकूल परिस्थितीत माझ्यासोबत उभी राहिली आहेत. त्यांच्याशिवाय कंपनी आज जिथे आहे तिथे नसती. त्यांच्या मेहनतीचं एक छोटसं फळ आहे.” Kissflow Inc. चे सीईओ सुरेश संबंदम म्हणाले की, हे पाच कर्मचारी कंपनीच्या स्थापनेपासून त्यांच्यासोबत आहेत.

या पाच भाग्यवान कर्मचाऱ्यांना कंपनीच्या सीईओकडून बीएमडब्ल्यू 530d मॉडेल भेट देण्यात आले. नेव्ही ब्लू ५ सीरिजच्या या गाड्यांची किंमत १-१ कोटी रुपये आहे. भेटवस्तू देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्य उत्पादन अधिकारी दिनेश वरदराजन, उत्पादन व्यवस्थापन संचालक कौशिक्रम कृष्णसाई, संचालक विवेक मदुराई, संचालक आदि रामनाथन आणि उपाध्यक्ष प्रसन्ना राजेंद्रन यांचा समावेश आहे.