Little Girl Recreates Madhuri Dixit’s Mai Ni Mai Dance Viral Video Wins Hearts: सोशल मीडियावर लहान मुलांचे गोंडस व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र, एखादी चिमुकली बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्रीच्या शैलीत तितक्याच सहजतेने आणि आत्मविश्वासाने नृत्य सादर करताना दिसली, तर तो व्हिडीओ पाहणारे क्षणभर थक्क होतात. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, तिच्या नृत्यकौशल्यानं आणि हावभावांनी लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बरकत अरोरा ही चिमुकली हम आपके हैं कौन या सुपरहिट चित्रपटातील माधुरी दीक्षित यांच्या गाजलेल्या ‘माई नी माई’ या गाण्यावर नृत्य करताना दिसते. विशेष म्हणजे तिने केवळ गाण्यातील स्टेप्सच हुबेहूब साकारलेल्या नाहीत; तर माधुरी दीक्षित यांच्या चेहऱ्यावरील भाव, हावभाव आणि नृत्यशैलीही अतिशय सहजपणे सादर केली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहणारे अनेक जण तिच्या कौशल्याचे भरभरून कौतुक करीत आहेत.
गुलाबी रंगाचा आकर्षक पोशाख परिधान केलेली बरकत गाण्याच्या प्रत्येक तालावर अतिशय आत्मविश्वासाने नृत्य करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरील निरागस स्मित, डोळ्यांतील भाव आणि प्रत्येक स्टेपमधील अचूकता पाहून अनेकांना काही क्षणांसाठी माधुरी दीक्षित यांच्याच नृत्याची आठवण झाली. म्हणूनच सोशल मीडियावर अनेकांनी तिला ‘मिनी माधुरी’, असेही संबोधले आहे.
विशेष म्हणजे माई नी माई हे गाणे जवळपास तीन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हम आपके हैं कौन या चित्रपटातील आहे. बरकतचे वय इतके कमी आहे की, तिने हा चित्रपट पाहिलाही नसेल, असे अनेकांनी म्हटले आहे. तरीसुद्धा गाण्यातील प्रत्येक हालचाल आणि भाव तिने ज्या सहजतेने साकारले आहेत, त्यामुळे तिच्या नृत्याचे विशेष कौतुक होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर होताच काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडीओला १९ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले असून, हा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्ते हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. काहींनी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले; तर काहींनी एवढ्या लहान वयात इतके सुंदर हावभाव सादर करणे ही मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, बरकत अरोरा सोशल मीडियावर नवा चेहरा नाही. यापूर्वीही तिने अनेक डान्स व्हिडीओंद्वारे प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. विविध टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही तिने आपल्या नृत्याची छाप सोडली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४४ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तिच्या प्रत्येक नव्या डान्स व्हिडीओची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
सध्या तिचा माई नी माई गाण्यावरील हा डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिचे निरागस हावभाव, अप्रतिम स्टेप्स आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यांमुळे हा व्हिडीओ लाखो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माधुरी दीक्षित यांच्या अजरामर गाण्याची जादू आणि एका चिमुकलीचे नृत्यकौशल्य सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
