या जगात काहींच्या ताटात जेवण उरतं तर काहींच्या वाट्याला तुकडेसुद्धा येत नाहीत. गरिबी इतकी कठीण असते की काही लोकांना जगण्यासाठी इतरांनी टाकलेलं अन्न खावं लागतं आणि आजही अनेक जण असंच आयुष्य जगत आहेत. याच संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांना भावूक करत आहे.

“मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एका व्हिडीओने पूर्ण राज्य हादरले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसणारे दृश्य गरिबी, भूक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल मोठे प्रश्न उभे करते. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एक छोटी मुलगी अन्न शोधताना दिसते. हे दृश्य पाहून लोकांमध्ये खूप वेदना, राग आणि असहाय्यता निर्माण झाली आहे. आजही अनेक लोक भूक आणि गरिबीशी कशी झुंज देत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

हा व्हिडीओ विदिशा शहरातील रस्त्याच्या कडेला शूट केल्याचे सांगितले जाते. व्हिडीओत कचऱ्याच्या ढिगाजवळ बसलेली मुलगी काहीतरी खायला शोधताना दिसते. शहराच्या गजबजलेल्या भागात अशी चित्रे दिसणे हे प्रशासनासाठी आणि समाजासाठीही खूप लाजीरवाणे आहे.

व्हिडीओमध्ये सुमारे ७–८ वर्षांची मुलगी कचऱ्याच्या ढिगात बसून उरलेले, फेकून दिलेले अन्न हातांनी वेचत आहे. तिच्या चेहऱ्यावर भूक आणि असहायता स्पष्टपणे दिसते. जवळून जाणारे वाहनांचे आवाज, धुळीने भरलेले वातावरण आणि तिचे रिकामे डोळे हे सर्व मिळून वातावरण अधिकच व्यथित करणारे दिसते.

पाहा व्हिडिओ

मुलीकडे कोणीही लक्ष देत नाही, कोणी थांबत नाही आणि ती मात्र शांतपणे कचऱ्यातून काहीतरी खाण्यासाठी शोधत राहते. समाजातील दुर्लक्षित घटक किती कठीण परिस्थितीत जीवन जगतात याचा हा मन हेलावून टाकणारा पुरावा आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक नागरिकांनी सरकारवर टीका करत, अशा अवस्थेत जगणाऱ्या कुटुंबांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, राज्यात कुपोषण, बालमृत्यू, महिलांवरील गुन्हे आणि दारिद्र्याचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे आणि सरकार मात्र भाषणबाजीवरच वेळ घालवत आहे. त्यांनी सीएमला उद्देशून सांगितले की, “इतर राज्यांत मोठे-मोठे भाषण देता, पण आपल्या राज्यातील मुलं कचऱ्यातून अन्न वेचायला मजबूर आहेत.

” सोशल मीडियावरील अनेक प्रतिक्रियांमध्ये लोकांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.काहींनी लिहिले, “ही फक्त मुलगी नाही, ही संपूर्ण व्यवस्था अपयशी ठरल्याचं चित्र आहे.” “कुठे आहे लाडकी बहीण योजना? कुठे गेला ₹३००० चा फायदा?” अशा पद्धतीने प्रश्न समोर आले आहेत.