वाईट वेळ कधी कोणावर येईल हे सांगता येत नाही…अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या एका वृद्ध व्यक्तीला रस्त्यावर भीक मागावी लागतेय. मन हेलावणारी ही घटना सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतेय.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधील आहे. आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलेल्या एका ९० वर्षाच्या वृद्ध व्यक्तीवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली. सुरेंद्र वशिष्ट असं या वृद्धाचं नाव आहे. ते दररोज बस स्टँडजवळ बसून भीक मागतात आणि कशीबशी पोटाची खळगी भरतात. या वृद्धाची दयनिय अवस्था बघून अखेर ‘आश्रम स्वर्ग सदन’ने त्यांची मदत केली आहे. या संघटनेनेने काही दिवसांपूर्वीच मनिष मिश्रा यांचीही अशाचप्रकारे मदत केली होती. मनिष पोलिस सेवेत होते आणि त्यांच्यावरही रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. त्यांच्या वर्गमित्राने त्यांना ओळखलं, त्यानंतर आश्रम स्वर्ग सदनने त्यांना आश्रय दिला.

फाडफाड इंग्रजी ऐकून हैराण :-
“अगदी निराधार आणि दयनिय अवस्थेत बस स्टँडजवळ ते आम्हाला भेटले…त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांचं फाडफाड इंग्रजी ऐकून हैराण झालो होतो”, असं आश्रम स्वर्ग सदनच्या बचाव पथकाचे सदस्य विकास गोस्वामी यांनी सांगितलं. सुरेंद्र यांची विचारपूस केली असता आयआयटी उत्तीर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं अशी माहिती विकास यांनी दिली. सुरेंद्र वशिष्ट यांनी 1969 मध्ये आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरींग पूर्ण केलं, त्यानंतर लखनऊच्या डीएबी कॉलेजमधून त्यांनी लॉमध्ये मास्टर्सचं (LLM ) शिक्षण घेतलं, असं विकास यांनी सांगितलं. “सुरेंद्र वशिष्ट यांना सध्या आश्रमात ठेवलं असून त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे, त्यासोबतच मनिष यांची परस्थितीही सुधारतेय”, अशी माहिती विकास गोस्वामी यांनी दिली.