Maharashtra Election 2024 Sada Sarvankar Viral Video : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवार गल्लोगल्ली लोकांच्या दारात जाऊन आपला प्रचार करत फिरत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र, यावेळी काही उमेदवारांना मतदारांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार माहीम विधानसभेचे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्याबाबतीत घडला. सदा सरवणकर माहीम कोळीवाड्यात प्रचारासाठी गेले असताना एका कोळी महिलेने त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आपला संताप व्यक्त केला. महिलेने “माहीम कोळीवाड्यातील फूड स्टॉल का हटवले” असा थेट सवाल सदा सरवणकरांना विचारत चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच महिलेने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून फटकारत चक्क त्यांना घरात येण्यास मनाई केली, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सदा सरवणकरांना करावा लागला कोळी महिलेच्या संतापाचा सामना

मुंबईतील माहीम मतदारसंघावर सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघातून मनसेविरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, प्रचारासाठी फिरत असताना सदा सरवणकर यांना एका कोळी महिलेच्या संतापाचा सामना करावा लागला. माहीम कोळीवाड्यातील महिलेने सदा सरवणकर यांना जाब विचारत घरात येऊ दिले नाही. यावेळी त्यांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिने काही ऐकून न घेता उलट त्यांनाच पुन्हा माघारी पाठवले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सदा सरवणकर प्रचारासाठी माहीम कोळीवाड्यात फिरत होते. यावेळी सदा सरवणकर एका कोळी महिलेच्या दाराजवळ जात हात जाडून नमस्कार करत मतदानाचे आवाहन करत होते. पण, महिलेने त्यांना पाहताच आपल्या प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. “आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला ते आधी सांगा, कधी चालू करणार?” म्हणत तिने प्रश्नांना सुरुवात केली. यावर उत्तर देत सदा सरवणकर यांनी “आम्ही लवकरच सुरू करू…” असे उत्तर दिले.

“तुम्ही बाहेरच राहा”; सदा सरवणकर यांचा प्रचारादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

यावर ती पुढे संतापलेल्या महिलेने सरवणकरांकडे पाहून दुसरा प्रश्न विचारला की, “आम्ही तुमच्या हातापाया पडून झालं. आमच्या पोटावर आलं आहे. लाडकी बहीण सांगता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा आम्हाला?” महिलेच्या प्रश्नावर सरवणकरांनी पुन्हा, “आम्ही लवकरच सुरू करू” असे उत्तर देत, “आपण घरात बसून यावर चर्चा करूया का?” अशी विचारणा केली. पण महिलेने त्यांना घरात येण्यास विरोध करत म्हटले की, “थेट घरात नको, तुम्ही बाहेरच राहा.” यावेळी महिलेच्या अशा वागणुकीमुळे सरवणकर कार्यकर्त्यांना घेऊन पुढे निघत असतात, पण महिला त्यांना विरोध करत “पुढे जाऊ नका आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या” म्हणत संताप व्यक्त करत राहते.

यावेळी सरवणकरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तिथून पुढे चला असे म्हणत होते, पण महिला वारंवार “माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय पुढे जाऊ नका”, असे म्हणत सरवणकर यांना तिने धारेवर धरत होती. परंतु, महिलेचा संताप पाहून सदा सरवणकर काहीही न बोलता तिथून निघून गेले. माहीम कोळीवाड्यातील महिलेचा सदा सरवणकरांविरोधात असलेला रोष पाहता आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Story img Loader