Two Men Stab Groom At Amravati Wedding: लग्न म्हणजे आनंद, जिव्हाळ्याचा आणि नवीन नात्यांच्या उत्सवाचा समारंभ. कोणताही लग्न समारंभ अतिशय थाटामाटात साजरा केला जातो. लग्न समारंभामध्ये छोटेमोठे मानपान रूसवे-फुगवे हे होतच असतात. मात्र महाराष्ट्रात एका लग्न समारंभात अचानक एक विचित्र घटना घडली आहे. अमरावतीतील बडनेरा इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न समारंभात चक्क एका नवरदेवावरच जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत नवरदेवाला गंभीर दुखापत झाली असून सध्या तो रूग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
या संपूर्ण घटनेदरम्यानचे ड्रोन फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, लग्नसमारंभ सुरू असताना तिथे ड्रोननेदेखील शूट केल जात होतं. त्यानंतर समारंभात अचानक नवरदेवावर हल्ला झाल्यानंतर ड्रोन कॅमेरामनने हल्लेखोरांचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.
मंगळवारी रात्री बडनेरा रोडवरील साहिल लॉन इथे एका लग्न समारंभात प्रचंड गोंधळ उडाला. बडनेरा इथल्या सुजल समुद्रे यांचे लग्न सुरू असताना अचानक दोन तरूणांनी नवरदेवावर धारदार चाकूने हल्ला केला. समारंभात हल्ला केल्यानंतर सुजल गंभीर जखमी झाला आणि वधू जागीच बेशुद्ध पडली. नवरदेवाच्या वडिलांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जखमी नवरदेवाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. तरी हा हल्ला का करण्यात आला याबाबत अद्याप काहीच स्पष्टता नाही.
