Bike Granny Viral Video : आजी म्हटलं की, घरच्या कामात रमणारी किंवा साडी नेसून आरामात पान-सुपारी चघळणारी, गप्पा-गोष्टी करणारी आजीची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते; पण जेव्हा तीच आजी अस्सल पारंपरिक मराठी पेहरावात थेट ‘रॉयल एनफिल्ड’ची दमदार बुलेट रस्त्यावर पळवताना दिसते, तेव्हा थक्क व्हायलाच होतं! एका आजीने ती जुनी प्रतिमा मोडून काढत सर्वांसमोर एक नवा थाट आणला आहे. वयाची बंधनं मोडत सोशल मीडियावर एका ‘बाइकर ग्रैनी’ने धुमाकूळ घातला असून, आजींचा हा दणदणीत अंदाज सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर लोक त्यांना प्रेमाने आता ‘बाइकर ग्रैनी’ किंवा ‘बाईक चालवणारी आजी’ म्हणत आहेत. वय वाढल्याने छंद सोडून देण्याची गरज नसते, हे या आजीने दाखवून दिले आहे. जर एखाद्या व्यक्तीला बाईक चालवण्याची आवड असेल, तर ती कोणत्याही वयात पूर्ण करता येते, हेही आजीने सिद्ध केले आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, नववारी साडी, केसात गजरा, कपाळावर ठसठशीत लाल टिकली अशा सुंदर मराठमोळ्या साजश्रृंगारात आजी नटल्या आहेत. अशा सुंदर वेशात त्या दमदार रॉयल एनफिल्ड चालवताना दिसतायत. बुलेट चालवतानाचा त्यांचा आत्मविश्वास तरुणांनाही लाजवेल असा आहे. त्यामुळे आजूबाजूने जाणारे सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत, काहीजण आश्चर्यचकित होऊन पाहत आहेत, तर काहींना व्हिडिओ काढण्याचा मोह आवरत नाहीये. त्यामुळे आजींचा स्वॅग सर्वांनाच जाम आवडला आहे. आजींचा हा ‘रॉयल’ स्वॅग असलेला व्हिडिओ अकोल्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

रॉयल एनफिल्ड ही सर्वसामान्यपणे एक दमदार आणि वजनदार बाईक मानली जाती. ती चालवण्यासाठी आत्मविश्वास आणि बाईकवर उत्तम पकड असणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी एका वृद्ध महिलेला या बाईकवर स्वार झालेले पाहून लोकांचे लक्ष त्यांच्याकडे खिळणे साहजिकच आहे. त्यांचा हा आत्मविश्वास त्या लोकांसाठी एक प्रेरणा आहे, जे असा विचार करतात की, काही गोष्टी फक्त तरुण वयातील लोकांसाठीच असतात.

या व्हिडिओतील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांचा पेहराव आणि बाईक यांच्यातील मेळ. एका बाजूला आपली संस्कृती आणि अस्मितेची ओळख करून देणारा अस्सल पारंपरिक मराठी लूक, तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची आणि आवडीनुसार जगण्याची अनुभूती देणारी रॉयल एनफिल्डसारखी दमदार बाईक. या दोघांचा हा अनोखा संगम त्यांना इतर सर्वांपेक्षा वेगळा ठरवतो.

आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटते की, एका ठराविक वयानंतर काही नवीन करणे किंवा आपले जुने छंद जोपासणे योग्य नाही; पण अशा घटना या विचारांना छेद देऊन नवीन दृष्टीकोन देतात. या आजींचे बाईक चालवणे म्हणजे केवळ एक वेगळे दृश्य नाही, तर ही एक आठवण आहे की, आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वयाची वाट पाहण्याची गरज नसते.

आजींचा हा रॉयल अंदाजातील व्हिडिओ thedivineduty नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर लोकही भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेकांनी त्यांना ‘रॉकिंग आजी’ म्हटले आहे. काहींनी ‘वय फक्त एक आकडा आहे’ असे म्हटले, तर काहींनी आजींना छान बुलेट चालवताना पाहून कौतुक केले आणि सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याचा सल्लाही दिला आहे.