भिवंडी व्हायरल Video: लग्नाच्या हॉलला आग लागली तरी तो निवांतपणे मटणावर मारत होता ताव

रात्री साडेबाराच्या सुमारास एका लग्नाच्या हॉलमध्ये ही भीषण आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाने दिली आहे.

Viral Video Bhiwandi Fire
हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

भिवंडीमधील अलाईड पेट्रोल पंपजवळ असणाऱ्या सुमारास खंडू पाडा येथील अन्सारी मेरेज ओपन हॉलला रविवारी म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. ही आग विझवण्यासाठी भिवंडी अग्निशामन दलाच्या एकूण तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं. सुदैवाने या आगीत कोणताही जिवीतहानी झाली नाही. ही आग विझल्यानंतर आता भिवंडीमध्ये चर्चा आहे ही आग लागली तेव्हा घटनास्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या लग्नामध्ये आलेल्या एका खव्वय्याची.

तसे सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. मात्र कालपासून हा व्हिडीओ भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लग्नसमारंभामध्ये ओपन लॉनवर बसून जेवणाचा आनंद घेताना दिसतेय. या व्यक्तीसमोरील जेवणाच्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे मटणाचे पदार्थ ठेवलेले आहेत. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण हे नसून या व्यक्तीच्या मागे आहे.

एकीकडे ही व्यक्ती मटणाचा आस्वाद घेत असताना मागे स्फोट होताना दिसतायत. आगीच्या ज्वाला अगदी उंच उच जात असताना ही व्यक्ती मात्र निवांत बसून मटणावर ताव मारताना दिसतेय. बरं ही व्यक्ती मागे लागलेली आग पाहते आणि पुन्हा जेवणाकडे आपला मोर्चा वळवताना दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या व्यक्तीचं वागण हे, ‘आग लगे बस्ती में हम अपनी मस्ती में’ या वाक्यप्रचाराशी साधर्म्य साधणारं असल्याचं म्हटलंय. काहींनी या व्यक्तीला फार फोकस व्यक्तीमत्व असल्याचा उपरोधिक टोला लगावलाय.

दरम्यान, भिवंडीमधील हॉलला लागलेल्या या आगीमध्ये जिवीतहानी झाली नसली तरी मंडपाच्या बाजूला असणाऱ्या आठ दुचाकी जळून खाक झाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Major fire at wedding ground in bhiwandi video of man casually eating food goes viral scsg