Major Rishabh Singh Sambyal Resignation: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ‘एड-डी-कॅम्प’ म्हणून सेवा बजावलेले मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी १२ वर्षांच्या सेवेनंतर मुदतपूर्व निवृत्ती घेतली आहे. सांब्याल यांची लष्करी कारकीर्द उज्ज्वल आहे, शिवाय इन्स्टाग्राम त्यांच्या अनेक रील्स व्हायरल झाल्यानंतर त्यांना नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जातं. दरम्यान, आता कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी मुदतपूर्व निवृत्तीचा निर्णय घेतला.
निवृत्तीच्या निर्णयाबाबत मेजर ऋषभ सिंह सांब्याल काय म्हणाले?
निवृत्तीच्या निर्णयावर विचार करण्यासाठी चार महिने घालवले असे सांब्याल यांनी द प्रिंटला माहिती देताना सांगितले. “माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण निर्णय आहे. मला काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत. हा निर्णय घ्यावा लागेल असा मी कधी विचारही केला नव्हता. खूप वेदनादायी होतं. निर्णय जाहीर करण्यासाठी खूप वेळ लागला,” असे सांब्याल यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना सांगितले.
निवृत्तीनंतर काय करणार?
ऋषभ सांब्याल यांनी यावेळी निवृत्तीनंतर काय करणार? याबाबतही खुलासा केला तसेच, भविष्यातील योजनांवर काम करण्यास सुरुवातही केल्याचेही नमूद केले. “मी एक मॉडेल तयार करतोय, त्यात तरुणांना प्रेरित करणे हा एक भाग आहे. मी देशाच्या विकासासाठी काम करेन आणि त्याबरोबर माझीही प्रगती होईल. मी यावर काम करतोय,” असे सांब्याल म्हणाले. सांब्याल यांनी यावेळी दैनंदिन काम आणि वर्दीची आठवण येत असल्याचेही ‘द प्रिंट’शी बोलताना नमूद केले.
अनेक Reels व्हायरल
दरम्यान, सांब्याल यांच्या राष्ट्रपती मुर्मू यांचे देखणे आणि रुबाबदार एड-डी-कॅम्प किंवा मदतनीस म्हणून अनेक रिल्स व्हायरल झाल्या. राष्ट्रपती मुर्मू भावूक झाल्यावर त्यांना स्वतःचा रुमाल देणे, त्यांच्यासाठी छत्री धरणे, त्यांच्या नातीशी आपुलकीने संवाद साधणे आणि राष्ट्रपतींच्या एका भाषणादरम्यान स्मितहास्य करणे यासारख्या भावुक क्षणांनी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. सांब्याल हे ३० वर्षांचे असून अविवाहित आहेत.
