Mother Daughters Viral Dance On Marathi Song : बालपणं देगा देवा असं म्हणतात ते उगाच नाही! आयुष्यातील सर्वात सुंदर काळ कोणता असेल तर तो बालपण. बालपणी ऐकलेले एखादे बडबडगीत कानावर पडले तरी आपल्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतात. आजच्या पिढीचे बालपण हे पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा बदलले असले तरी अजूनही एक गोष्ट सारखीच आहे ती म्हणजे ही सुंदर मराठीतील बडबड गीते. पिढ्यान पिढ्या गायलेली, ऐकलेली ही बडबड गीते आजही आपल्याला तोंडपाठ असतात. आजच्या पिढीपर्यंतही ती पोहचली आहेत फक्त त्यांचा अंदाज बदलला आहे. पुर्वी आजी-आजोबा,मावशी-काका, मामा-मामी, आई-बाबा किंवा ताई-दादा अशी मंडळी आपल्यासाठी ही बडबड गीते गात असे पण आजची पिढी या गाण्याचे व्हिडीओ पाहत मोठी होत आहे. अनेकदा लहान मंडळी टिव्हीवर गाणी लावून थिरकताना दिसतात.

काळाच्या पडद्याआड गेलेले दिवस पुन्हा जिवंत करण्याची ताकद या गाण्यांमध्ये असते. आजच्या काळात कितीही नवीन ट्रेंड्स आले तरी, या अजरामर गाण्यांची जादू अन् गोडवा आजही प्रत्येकाच्या मनावर तसाच राज्य करत आहे. अशाच एका बडबड गीतावर थिरणाऱ्या मायलेकींचा क्युट आणि भन्नाट व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर तुफान ट्रेंड होतोय. आशा भोसले यांच्या अजरामर ‘मामाच्या गावाला जाऊ या…’ या प्रसिद्ध बालगीतावर या मायलेकींनी जो काही डान्स केलाय ते पाहून नेटकरी त्यांच्या प्रेमात पडले आहेत.

आरशासमोर थिरकल्या मायलेकी, क्युट एक्सप्रेशन्सने जिंकली मने

सध्या रील्स बनवण्यासाठी नवनवीन लोकेशन शोधली जातात, पण या मायलेकींनी चक्क आपल्या घरातील बाथरुम निवडले! बाथरुममधील आरशासमोर उभं राहून चिमुकली तिच्या आईबरोबर मामाच्या गावाला जाऊ या…’ या गाण्यावर थिरकत आहे. या गाण्यातील ‘मामाची बायको गोरटी, म्हणेल कुठली पोरटी” या ओळीवर ती नाचत आहेत . तिचे हावभाव इतके गोंडस आहेत ती पाहणाऱ्यांची नजरच हटणार नाही. या चिमुकलीच्या अदा अन् अंदाज इतका गोड आहे की नेटकरी हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत.

कमेंट्सचा पडतोय पाऊस; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. एका युझरने लिहिले, “आजही या बालगीतावर रील बनवून तुम्ही जुन्या पिढीला बालपणात नेले. सांग सांग भोलानाथ, नाच रे मोरा, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या जुन्या गाण्यांची उजळणी झाली.” तर दुसऱ्या युझरने मजेशीर कमेंट करत लिहिले, “मामा विचार करतोय माझं अजून लग्नच नाही झालं, आणि यांनी काय लावलंय!” आणखी एकाने गंमतीत म्हटले, “हे रील जर मामीने बघितलं, तर दोघींना घरात घेणार नाही.”

अनेक नेटकऱ्यांनी या मायलेकींच्या बॉन्डिंगचे भरभरून कौतुक केले आहे. काहींनी हा व्हिडिओ तब्बल २० वेळा पाहिल्याचे सांगितले, तर काहींनी चिमुकलीला ‘छोटी रॉक्स’ अशी उपमा दिली आहे.

जुन्या आठवणींना उजाळा

‘मामाच्या गावाला जाऊ या’ हे गाणे प्रत्येक पिढीच्या बालपणाचा एक अविभाज्य भाग राहिले आहे. आजच्या डिजिटल युगात ‘ट्विंकल ट्विंकल’ ऐकणाऱ्या नवीन पिढीला अशा मराठी बालगीतांवर थिरकताना पाहून जुन्या पिढीतील लोकांना प्रचंड आनंद होत आहे. या व्हिडिओने अनेकजण बालपणीच्या आठवणीत रमले असून असून मायलेकींची ही क्युट जुगलबंदी सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुफान ट्रेंड होत आहे.

गाण्याबद्दल थोडं…

हे अतिशय लोकप्रिय बालगीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या मधूर आवाजात गायले आहे. ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी नटलेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी सुरांचा साज चढवला आहे. हे अजरामर बालगीत १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तू सुखी रहा’ या मराठी चित्रपटातील असून, गेल्या कित्येक दशकांपासून ते प्रत्येक लहान-मोठ्या पिढीच्या ओठांवर आजही तितक्याच प्रेमाने राज्य करत आहे.