Man across railway crossing with bike on his shoulders : रेल्वे प्रशासनाकडून रेस्ल्वे स्टेशन आणि क्रॉसिंगच्या ठिकाणी रेल्वेचे रूळ ओलांडताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकदा आपण पाहातो की लोक याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे क्रॉसिंगवर एक व्यक्ती फाटक उघडण्याची वाट बघावी लागू नये म्हणून चक्क त्याची दुचाकी खांद्यावर उचलून घेताना दिसतो आहे. खांद्यावरील ही दुचाकी घेऊन हा व्यक्ती रेल्वे फाटक ओलांडतो.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘घर के कलेश’ या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला जवळपास तीन लाख व्ह्यूव्ज मिळाले आहेत.

भारत फक्त अल्ट्रा प्रो मॅक्स लोकांसाठी

व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोक आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत कमेंट केली आहे की, “जॉन इब्राहिमला याचे लोकेशन हवे आहे.” तर दुसर्‍या एकाने म्हटले, “कोण म्हणतो की भारतात आयर्नमॅन नाही? मार्वल या व्यक्तीला शोधत आहे. आगामी सुपरहिरो.” तर तिसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, “भारत फक्त अल्ट्रा प्रो मॅक्स लोकांसाठी आहे.”

दरम्यान काही जणांनी या व्यक्तीच्या हलगर्जीपणाबद्दल त्याच्यावर टीका केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “बाइकच काय तुम्ही कार देखील खांद्यावर उचलून घ्या, पण ट्रेन तरीही थांबणार नाही. लोक इंप्रेस होतील, ट्रेन नाही.”

यापूर्वीही व्हायरल झाला होता व्हिडीओ

दुचाकी उचलून खांद्यावर घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील हा धोकादायक स्टंट एकदा चर्चेत आला होता. २०२२ मध्ये एक व्यक्ती बसच्या वर ठेवण्यासाठी बाईक घेऊन शिडीवर चढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा देखील याची चांगलीच चर्चा झाली होती.