Most Wanted आरोपींच्या यादीत नाव नसल्याचं आरोपीनेच FB वर कमेंट करुन सांगितलं; पोलिसांनी आधी Reply केला अन् नंतर... | Man arrested after commenting how about me on police most wanted list on Facebook scsg 91 | Loksatta

Most Wanted आरोपींच्या यादीत नाव नसल्याचं आरोपीनेच FB वर कमेंट करुन सांगितलं; पोलिसांनी आधी Reply केला अन् नंतर…

पोलिसांच्याच पोस्टवर केलेली कमेंट या व्यक्तीला फारच महागात पडल्याची चर्चा

Most Wanted आरोपींच्या यादीत नाव नसल्याचं आरोपीनेच FB वर कमेंट करुन सांगितलं; पोलिसांनी आधी Reply केला अन् नंतर…
पोलिसांनी आरोपीला अटक केली (Photos: Facebook/Rockdale County Sheriffs Office)

अमेरिकेतील जॉर्जिया येथे अगदी चमत्कारिकपणे पोलिसांनी एका मोस्ट वॉण्टेड आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत आपला समावेश का नाही अशी कमेंट करणाऱ्या एका फरार आरोपीला पोलिसांनी शोधून काढलं आणि तुरुंगात टाकलं आहे.

ख्रिस्तोफर स्पाउल्डींग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. रॉकडेल कंट्री शेरिफ ऑफिस म्हणजेच रॉकडेल पोलीस स्थानकाने जारी केलेल्या मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीमध्ये आपलं नाव नसल्याने ख्रिस्तोफर नाराज होता. टॉप १० मोस्ट वॉण्टेड आरोपींची यादी पोलिसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टखाली ख्रिस्तोफरने कमेंट करुन यात आपलं नाव नसल्याचं म्हटलं होतं. या कमेंटनंतर ख्रिस्तोफरला पोलिसांनी अटक केली.

खून, चोऱ्या, हाणामारी, अपहरण यासारख्या आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपींची यादी पोलिसांच्या अधिकृत पेजवरुन पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टवर ख्रिस्तोफरने, “माझ्याबद्दल काय विचार आहे” अशी कमेंट केली. या कमेंटला पोलिसांनीही रिप्लाय केला. “तुझं बरोबर आहे. तुझ्या नावावर दोन वॉरंट आहेत. आम्ही तुला अटक करण्यासाठी येतच आहोत,” असं उत्तर पोलिसांनी दिलं.

जॉर्जिया पोलिसांकडील माहितीनुसार ख्रिस्तोफर स्पाउल्डींगविरुद्ध दोन अटक वॉरंट आहेत. यामध्ये त्याने नियमांचा भंग करुन बेकायदेशीर वर्तन केल्याचं म्हटलं आङे. मात्र या प्रांतामधील मोस्ट वॉण्टेड आरोपींची यादी अधिक गंभीर प्रकरणांच्या आधारे तयार करण्यात आली असल्याने त्यामध्ये ख्रिस्तोफरचं नाव नव्हतं. याचबद्दल ख्रिस्तोफरने आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला घरी जाऊन ताब्यात घेतलं. “तुम्ही मोस्ट वॉण्टेड लोकांच्या यादीत नाही म्हणजे तुमचा शोध घेतला जात नाहीय असं समजू नये,” असंही पोलिसांनी ख्रिस्तोफरला अटक करण्यासंदर्भात दिलेल्या माहितीच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

अनेकांनी ख्रिस्तोफरने स्वत:ला अनोख्या पद्धतीने अटक करुन घेतल्याचं म्हटलंय. तर बऱ्याच जणांनी पोलिसांनी दिलेला प्रतिसाद आणि तातडीने केलेल्या कारवाईचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 16:14 IST
Next Story
नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल