Viral Video Man Urinating Inside Train: रेल्वे प्रवासात स्वच्छता आणि शिस्तीचे नियम पाळण्याचे आवाहन वारंवार केले जाते. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रेल्वे प्रवाशांच्या वर्तनावर आणि गर्दीच्या डब्यांमधील परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनच्या डब्यात एका व्यक्तीने लघुशंका केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला. व्हिडीओमध्ये ट्रेनचा डबा प्रवाशांनी पूर्णपणे भरलेला दिसत आहे. बर्थसोबतच जमिनीवरही प्रवासी बसलेले दिसतात. याच गर्दीमध्ये एक व्यक्ती उठून डब्यातच लघुशंका करताना दिसतो. अत्यंत किळसवाणा असा हा प्रकार काही प्रवाशांनी व्हिडीओ काढत संताप व्यक्त केला.
प्रवाशांनी रोखलं, मात्र वाद वाढल्याचा दावा
व्हिडीओसोबत करण्यात आलेल्या पोस्टनुसार, काही प्रवाशांनी या व्यक्तीला डब्यात लघुशंका करण्याऐवजी ट्रेनमधील स्वच्छतागृहाचा वापर करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीचा प्रवाशांशी वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये काही प्रवासी त्या व्यक्तीला जाब विचारताना दिसतात. काही जण त्याला मारहाण करतानाही दिसत आहेत. तसेच, या घटनेची तक्रार करण्याबाबत प्रवासी बोलताना ऐकू येतात. या व्हिडीओची स्वतंत्रपणे सत्यता किंवा घटनेचा संपूर्ण संदर्भ निश्चित झालेला नाही.
Railway Seva कडून दखल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाशी संबंधित Railway Seva कडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. घटनेची चौकशी करण्यासाठी ट्रेन क्रमांक, PNR क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच घटनेची तारीख आणि वेळ यांसारखी संपूर्ण माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. Railway Seva ने प्रवाशांना अधिकृत तक्रार नोंदवण्यासाठी RailMadad पोर्टलचा वापर करण्यासही सांगितले आहे.
सोशल मीडियावर संतापाचा सूर
व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी संबंधित व्यक्तीच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी गर्दीच्या ट्रेनमध्ये अशा परिस्थितीपर्यंत प्रवासी का पोहोचतात, असा मुद्दाही उपस्थित केला. एका यूजरने व्हिडीओमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना संबंधित व्यक्तीला वैद्यकीय आणि कायदेशीर मदतीची गरज असू शकते, असे म्हटले. दुसऱ्या यूजरने, प्रवाशांनी तातडीने हस्तक्षेप करण्याऐवजी व्हिडीओ का रेकॉर्ड केला, असा सवाल केला.
तर आणखी एका यूजरने, “फक्त एकच व्यक्ती त्याला मारताना का दिसत आहे आणि बाकीचे प्रवासी फक्त पाहत का होते?” असा प्रश्न उपस्थित केला. काही सोशल मीडिया यूजर्सनी अशा प्रकारच्या गैरवर्तनासाठी कठोर कारवाईची मागणीही केली आहे.
गर्दीच्या ट्रेनमधील परिस्थितीवरही चर्चा
या घटनेमुळे केवळ संबंधित व्यक्तीच्या वर्तनावरच नव्हे, तर रेल्वे डब्यांमधील प्रचंड गर्दी, स्वच्छता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. गर्दीच्या डब्यात प्रवाशांना अनेकदा अस्वच्छता आणि जागेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो, असा मुद्दा सोशल मीडियावर मांडला जात आहे. दरम्यान, या घटनेची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच नेमकी परिस्थिती आणि संबंधित व्यक्तीविरोधात कोणती कारवाई करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकते.
