Bird heartwarming Video : निसर्ग आणि पक्ष्यांशी माणसाचे नाते किती घट्ट असू शकते, याचे एक अप्रतिम उदाहरण सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण नारळ फोडून, त्यातून पाणी काढताना दिसत आहे; तर एक लहान मैना कोणत्याही भीतीशिवाय त्याच्याजवळ आरामात वावरताना दिसत आहे. त्यानंतर तो तरुण असे काही करतो की, ते पाहून तुमचे मनही आनंदाने भरून जाईल, तसेच प्रश्न पडेल की, पक्षी खरेच माणसावर एवढा विश्वास ठेवू शकतात का?
माणसाची भीती नाही, तर विश्वासाची ऊब!
पक्षी सहसा माणसांची चाहूल लागताच किंवा थोडा जरी आवाज झाला तरी लगेच उडून जातात. माणसांवर पूर्ण विश्वास ठेवणे पक्ष्यांच्या बाबतीत अत्यंत दुर्मीळ मानले जाते. मात्र, या व्हायरल व्हिडीओने हा समज फोल ठरवला आहे. एका चिमुकल्या मैनेने एका अनोळखी तरुणावर दाखवलेला हा अथांग विश्वास पाहून थक्क व्हायला होते.
चिमणीने ड्रॉपरने प्यायले नारळ पाणी!
हा व्हिडीओ एखाद्या ग्रामीण भागातील असल्याचे दिसून येते. व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुण जमिनीवर बसून आरामात नारळ सोलत आहे. त्याच्याजवळ एक नारळ आणि पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे. विशेष म्हणजे नारळ सोलताना होणाऱ्या मोठ्या आवाजानेही तिथली लहानगी मैना अजिबात घाबरत नाही; उलट ती त्याच्या अवतीभवती आनंदाने घिरट्या घालत राहते.
व्हिडीओचा सर्वांत हृदयस्पर्शी क्षण तेव्हा येतो, जेव्हा तो तरुण नारळाचे पाणी ग्लासात काढतो आणि एक ड्रॉपर हातात घेतो. तो अत्यंत मायेने त्या मैनेला ड्रॉपरद्वारे नारळ-पाणी पाजू लागतो. ती मैनाही कोणत्याही भीतीशिवाय अगदी हक्काने त्याच्याजवळ येते आणि घटाघटा नारळ-पाणी पिऊ लागते.
पाखरासाठी देवदूत बनला तरुण!
कडक उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. अशा भीषण उन्हात या तरुणाने दाखवलेली माणुसकी आणि त्या मैनेची भागवलेली तहान खरोखरच कौतुकास्पद आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांच्या मते, ही त्यांची पहिली भेट नसावी. या दोघांमध्ये आधीपासूनच एक अनोखे आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडीओ ‘एक्स’वर @arvindmarag नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया युजर्स हा व्हिडीओ वारंवार पाहत असून, त्यावर कमेंट्सचा वर्षाव करीत आहे. एका युजरने लिहिले, “माणुसकी अजून जिवंत आहे, हेच या व्हिडीओतून दिसते.” तर दुसऱ्याने लिहिले, “प्राणी आणि माणसातील एवढा निस्सीम विश्वास खूप दिवसांनी पाहायला मिळाला.” हा केवळ एक व्हिडीओ नसून, कडक उन्हाळ्यात मुक्या प्राण्यांविषयी संवेदनशीलता जपण्याचा एक सुंदर संदेश आहे.
