30 Years old UTI Bond News: जुने कागदपत्रे चाळताना एका व्यक्तीला ३० वर्ष जुने ‘यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे (UTI) बॉण्ड घरात आढळून आले. १९९५ मध्ये त्याच्या काकांना सेवा निवृत्ती लाभ योजनेअंतर्गत एकूण दोन हजार बॉण्ड मिळाले होते. प्रत्येक १० रूपये किंमत असलेले २० हजार रुपये किंमतीचे बॉण्ड त्यांना मिळाले होते.
Reddit या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर या बॉण्डचा फोटो शेअर करण्यात आला आहे. @Warking223 या हॅण्डलवरून बॉण्डचा फोटो पोस्ट करण्यात आला असून ३० वर्षांपूर्वी सापडलेल्या या बॉण्डची आजची किंमत किती आहे, हे कोणी सांगू शकेल का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “या बॉण्डची आजची किंमत २३ लाख रुपये आहे”, असे एक नेटकरी म्हणाला. तर “या बॉण्डची आजची किंमत कोट्यावधी रुपये आहे”, असे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे. या बॉण्डची आजची खरी किंमत किती आहे, हे जाणून घेऊ.
“माझ्या काकांना जुनी कागदपत्रे चाळताना हा बॉण्ड मिळाला, याची आजची किंमत काय?”, असा प्रश्न Reddit वर बॉण्डचा फोटो पोस्ट करून विचारण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज लावले. ‘सेवानिवृत्ती लाभ योजना’ असे बॉण्डवर लिहिलेले दिसत आहे. तसेच हे बॉण्ड अहस्तांतरणीय असल्याचे बॉण्डवर नमूद आहे. १९९५ मध्ये मुंबईत हे बॉण्ड संबंधित व्यक्तीला मिळाले आहेत. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना या बॉण्डची किंमत २३ लाख रुपये असल्याचे एकाने म्हटले. तर दुसऱ्याने या बॉण्डची किंमत सात कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे.
बॉण्डची खरी किंमत किती ?
नेटकरी या बॉण्डची किंमत कोट्यवधी रुपये सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळे आहे. १२ डिसेंबर २०२५ रोजी UTI च्या एका बॉण्डची करंट नेट असेट व्हॅल्यू म्हणजे आजची किंमत ५०.७१ रूपये आहे. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी प्रत्येकी १० रुपये किंमत असलेल्या बॉण्डच्या किंमतीत पाच पट वाढ होऊन त्याची आजची किंमत ५०.७१ रुपये आहे. त्यामुळे ३० वर्षांपूर्वीच्या या बॉण्डची आजची किंमत ही १ लाख एक हजार ४२० रुपये इतकी आहे.
