Husband Gives Salary to Wife for Housework: घरकामाला खरंच किंमत नाही का? स्वयंपाक, साफसफाई, घरातील प्रत्येकाची काळजी घेणे, रोजची कामे सांभाळणे… ही सगळी कामे करणाऱ्या गृहिणीला त्यासाठी आर्थिक मोबदला मिळायला हवा का? सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका Reddit युजरने आपल्या ओळखीच्या दाम्पत्याबद्दल एक अनुभव शेअर केला आहे. पती सरकारी अधिकारी असून, त्यांची पत्नी गृहिणी आहे. मात्र या कुटुंबातील पैशांचे नियोजन करण्याची पद्धत इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे.
पती आपल्या पत्नीला तिच्या घरातील कामासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम देतो. विशेष म्हणजे ही रक्कम घरखर्चासाठी नसते, तर पूर्णपणे तिच्या वैयक्तिक वापरासाठी असते.
घरखर्च वेगळा, पत्नीचे पैसे वेगळे!
Reddit पोस्टनुसार, घरातील किराणा, वीजबिल, इतर खर्च आणि दैनंदिन गरजांसाठी लागणारे पैसे पती स्वतंत्रपणे देतो. पत्नीला दिली जाणारी मासिक रक्कम केवळ तिच्यासाठी असते. ती पैसे बचत करू शकते, स्वतःसाठी खर्च करू शकते किंवा आपल्या आई-वडिलांना देऊ शकते. यासाठी तिला पतीची परवानगी घेण्याची गरज नसते. या व्यवस्थेमागे पतीचा एक वेगळा विचार असल्याचे Reddit युजरने सांगितले.
‘घरकामाची किंमत शून्य कशी?’
या व्यक्तीच्या मते, पत्नी घरातील स्वयंपाक, साफसफाई आणि इतर दैनंदिन कामे करते. जर हीच कामे करण्यासाठी एखादी स्वयंपाकी, घरकाम करणारी व्यक्ती किंवा होम मॅनेजर ठेवला, तर त्याला पैसे द्यावे लागतील. मग तेच काम पत्नी करत असेल तर त्याची किंमत शून्य का मानायची? असा प्रश्न पती उपस्थित करतो. त्याच्या मते, घर सांभाळणे ही केवळ ‘पत्नीची जबाबदारी’ नसून त्यासाठी वेळ, मेहनत आणि ऊर्जा खर्च होते. त्यामुळे त्या श्रमांना आर्थिक मान्यता मिळणे योग्य आहे.
‘पती बॉस नाही, दोघेही समान भागीदार’
Reddit पोस्टमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब सांगण्यात आली आहे. पत्नीला पैसे दिल्यामुळे पती स्वतःला तिचा मालक किंवा बॉस समजत नाही. दोघेही स्वतःला समान भागीदार मानतात. पत्नीला मिळणाऱ्या पैशांवर तिचा पूर्ण अधिकार आहे. Reddit युजरने या पद्धतीबद्दल आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, भारतीय कुटुंबांमध्ये आर्थिक व्यवहाराची अशी पद्धत त्याने यापूर्वी फारशी पाहिलेली नाही. साधारणपणे पती-पत्नीचे संयुक्त खाते असते किंवा पत्नीला गरजेनुसार पैसे दिले जातात. मात्र या प्रकरणात गृहिणीला स्वतःचे स्वतंत्र पैसे मिळतात.
गृहिणीच्या आर्थिक स्वातंत्र्यावर चर्चा
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर गृहिणींच्या आर्थिक स्वातंत्र्याबाबत चर्चा सुरू झाली. काही युजर्सनी या कल्पनेचे समर्थन केले. त्यांच्या मते, घरातील काम करणाऱ्या महिलेला प्रत्येक छोट्या गरजेसाठी पतीकडे पैसे मागावे लागू नयेत. स्वतःच्या हातात काही पैसे असल्यामुळे तिचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबनाची भावना वाढू शकते.
एका युजरच्या मते, अनेक वर्षांपासून महिलांकडून केली जाणारी घरातील कामे ‘काम’ म्हणूनच पाहिली जात नाहीत. त्यामुळे पत्नीच्या हातात स्वतःचे पैसे असणे तिला मानसिकदृष्ट्याही अधिक आत्मविश्वास देऊ शकते. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, गृहिणी दिवसभर घरातील कामांमध्ये वेळ घालवत असेल, तर तिला स्वतःसाठी पैसे मिळणे ही चांगली कल्पना आहे.
मात्र काहींनी वेगळा मुद्दाही मांडला
सर्वच युजर्स या व्यवस्थेला पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य मानत नाहीत. एका कमेंटमध्ये असे म्हटले आहे की, पत्नीला दर महिन्याला ठराविक पैसे मिळत असले तरी ती अजूनही पतीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असू शकते. कारण मासिक रक्कम मिळणे आणि स्वतःचे करिअर किंवा स्वतंत्र उत्पन्न असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गृहिणीच्या घरकामाला आर्थिक मूल्य देणे निश्चितच सकारात्मक आहे; मात्र त्यातून तिच्या करिअरची किंवा दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनाची गरज संपत नाही, असा मुद्दाही काहींनी मांडला.
घरकामाची किंमत ठरवता येते का?
या संपूर्ण चर्चेचा मुख्य प्रश्न मात्र एकच आहे, घर सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या श्रमांना आर्थिक मूल्य द्यायला हवे का? घरकामाला ‘कर्तव्य’ म्हणून पाहायचे की ‘काम’ म्हणून, यावर मतभेद असू शकतात. पण स्वयंपाक, साफसफाई, घरातील व्यवस्थापन आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि मेहनत लागते, हे नाकारता येत नाही. या Reddit पोस्टमुळे पती-पत्नीमधील आर्थिक समानता, गृहिणीचे आर्थिक स्वातंत्र्य आणि घरकामाचे मूल्य या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
