बायकोसाठी कायपण! तिला वाईट वाटू नये म्हणून साड्या चोरल्या

प्रेमात सारं काही माफ असतं

(प्रातिनिधिक छायाचित्र/ Pinterest)

प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं आपण ऐकत आलोय तेव्हा आपलं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे त्यांच्यासाठी लोक कधीकधी वाट्टेल ते करायला तयार होतात. आता हेच बघा ना! छत्तीसगढमधल्या बिसापूर इथल्या एका पतीने आपल्या पत्नीसाठी चक्क साड्यांच्या दुकानावर डल्ला मारला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्रीकांत गुप्ता यांची पत्नी प्रमिला गुप्ता एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली होती. बिसपूरमध्ये दरवर्षी ‘सावन सुंदरी’ नावाची सौंदर्य स्पर्धा भरते. या स्पर्धेत हजारो महिला सहभागी होतात. ही स्पर्धा जिंकणे हे अनेक महिलांचं स्वप्न असतं. या स्पर्धेत आपल्या पत्नीला कोणताही कमीपणा वाटू नये म्हणून श्रीकांत यांनी मॉलमधून दोन डिझायनर साड्या चोरून तिला भेट दिल्या.

या स्पर्धेत अनेक महिला महागड्या साड्या घालून येतील त्यावेळी या महिलांसोबत वावरणाऱ्या आपल्या पत्नीला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने चोरी केली. तिच्यासाठी महागड्या साड्या खरेदी करण्याची आपली ऐपत नव्हती तेव्हा आपण डिझायनर साड्या चोरल्या असं त्याने पोलिसांसमोर कबुल केलं. या स्पर्धेसाठी आलेल्या एका प्रेक्षकांनी प्रमिलाने नेसलेली साडी पाहिली. दुकानातून चोरी झालेली ही तिच साडी असल्याचं त्यानं मालकाला लक्षात आणून दिलं. पोलिसांनी साडी चोरली म्हणून श्रीकांतला अटक केल्याचं हिंदुस्थान टाइम्सने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man just stole designer saris for his wife beauty contest