Dangerous train stunt: सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही सेकंद फेमस व्हायचं म्हणून व्हिडीओ व्हायरल करायचा आणि जास्तीत जास्त लाईक्स-व्ह्युज मिळवायचे या नादात आजची तरुण पिढी अनेकदा धोकादायक गोष्टी करताना दिसते. मोबाईल कॅमेरा सुरू झाला की काहीतरी वेगळं आणि काही तरी थरारक करायच्या यासगळ्यात लोक स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाहीत. फक्त लोकांनी पाहावं, शेअर करावं आणि आपण प्रसिद्ध व्हावं एवढंच डोक्यात असतं.

या प्रसिद्धीच्या नशेमुळे काय बरोबर आणि काय चूक, काय सुरक्षित आणि काय धोकादायक, याचा विचारच लोक करत नाहीत. सोशल मीडियावर रोज व्हायरल होणारे असे अनेक व्हिडीओ हेच दाखवतात की क्षणभर प्रसिद्ध होण्यासाठी माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो. हे चित्र खरंच धक्कादायक असून समाजासाठी चिंतेची गोष्ट बनत चालली आहे.

अशातच सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या लोकल ट्रेनच्या दरवाज्यातून बाहेर लटकून जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन सुटत असतानाच हा तरुण एका हाताने ट्रेनचा दरवाजा पकडून शरीर पूर्णपणे बाहेर काढतो. त्याचे पाय प्लॅटफॉर्मकडे पसरलेले असून तो कसाबसा तोल सांभाळत आहे. त्याच्या मागे उभे असलेले दोन तरुण त्याला थांबवण्याऐवजी उलट त्याला साथ देताना दिसतात.

हा सगळा प्रकार फक्त रील किंवा व्हिडीओ बनवण्यासाठीच केला असावा असा अंदाज आहे. पण, जर त्याचा हात सुटला असता तर मोठा अपघात घडू शकला असता. लोकल ट्रेनसारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टंट करणे फक्त त्या तरुणासाठीच नाही, तर आजूबाजूच्या इतर प्रवाशांसाठीही खूप धोकादायक आहे. तरीसुद्धा कोणतीही भीती न बाळगता तो युवक हा जीवावर बेतणारा प्रकार करताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. @gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. अनेक युजर्सनी या प्रकारावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. एका युजरने “याला पकडून नीट समज द्यायला हवी” अशी प्रतिक्रिया दिली आहे; तर दुसऱ्याने “पोलिसांचे फटके बसल्याशिवाय अशांना अक्कल येत नाही” असे म्हटले आहे

काही युजर्सनी तर या प्रकाराला ‘छपरीपणा’ म्हणत पालकांच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही वेडेपणाची स्पर्धा कुठे नेऊन ठेवेल, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. अशा घटनांमधून वेळीच धडा घेतला नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.