Viral Video Of An Old Man Sneaking Into Neighbors Houses : शेजारी म्हटलं की सर्वांना शेजारधर्म हीच गोष्ट आठवते. प्रत्येक शेजारी चांगला असतो असेल नाही. अनेकदा शेजाऱ्यांना आपल्या घरापेक्षा इतरांच्या घरात काय सुरु आहे हे जाणून घेण्यात रस असतो. शेजाऱ्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवतात अन् संधी मिळाली की त्यांच्या विरोधात वापरतात. अनेकदा ही वृत्ती शेजाऱ्यांबाबत अफवा पसरवण्यापर्यंत जाते. शेजाऱ्यांच्या घरी जरा कुरुबूर झाली काय झाले हे जाणून घेण्यासाठी या लोकांची चलबिचल होते. अशाच एका शेजाऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. शेजार घरात काय सुरु हे जाणून घेण्यासाठी या व्यक्तीने सर्व हद्द पार केल्या आहेत. एवढं नाही तर स्वत:चा जीव धोक्यात टाकून हा व्यक्ती शेजाऱ्यांवर पाळत ठेवत आहे.
सोशल मीडियावर सध्या एका वृद्ध व्यक्तीचा धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्यक्ती एका उंच इमारतीच्या खिडकीबाहेरील अरुंद कड्यावर बसला आहे आणि शेजारच्या फ्लॅट बाल्कनीकडे झुकून मोबाईल फोनमध्ये काहीतरी शूट करत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार कोणीतरी मोबाईलमध्ये शुट केला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे.
शेजाऱ्यांच्या घरात डोकावण्यासाठी टाकला जीव धोक्यात?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक उंच निवासी टॉवर्स दिसत आहेत. सुरुवातीला हा व्हिडीओ नेहमीसारखाच वाटतो. मात्र काही क्षणांनंतर व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती एका विशिष्ट फ्लॅटकडे झूम करते आणि तेथील दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.
व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या फ्लॅटच्या खिडकीबाहेरील अत्यंत अरुंद काँक्रीटच्या कड्यावर बसलेली दिसते. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन असल्याचेही दिसून येते. त्यानंतर तो शेजारच्या फ्लॅटच्या बाल्कनीच्या दिशेने झुकलेला दिसतो. तो इतक्या धोकादायक स्थितीमध्ये लटकत आहे की छोटी चूक झाली तर तो उंचावरून खाली पडू शकतो. हे माहित असूनही तो व्यक्ती जीवाची पर्वा न करता शेजारच्या फ्लॅटमध्ये डोकवण्यात उत्सूक असल्याचे दिसते.
जीव धोक्यात घालून करत होता शुटिंग
व्हिडीओमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध व्यक्ती ज्या ठिकाणी बसलेली आहे तेथून खाली अनेक मजल्यांची खोल दरी आहे. अशा परिस्थितीत किंचित तोल गेला असता मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र तरीही संबंधित व्यक्ती काही सेकंद शेजारच्या फ्लॅटकडे झुकून मोबाईल वापरताना दिसते.
त्यामुळे तो शेजाऱ्यांच्या घराचे चित्रीकरण करत होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तथापि, व्हिडीओवरून नेमके काय रेकॉर्ड केले जात होते याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. “एक चुक आणि मोठा अपघात झाला असता,” असे काहींनी म्हटले.
तर काहींनी गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित करत, जर संबंधित व्यक्ती शेजाऱ्यांच्या घरात डोकावण्याचा किंवा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली.
लोकेशन आणि तारीख अद्याप अस्पष्ट
हा व्हिडीओ सर्वप्रथम इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर तो एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरला. मात्र ही घटना नेमकी कुठे घडली आणि कधी घडली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दोन मोठे प्रश्न चर्चेत
या व्हायरल व्हिडीओमुळे दोन महत्त्वाचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. पहिला म्हणजे उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत किती काळजी घ्यावी आणि दुसरा म्हणजे निवासी संकुलांमधील वाढती गोपनीयतेची चिंता.दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले असून, सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
