सोशल मीडियाचं जग रोज नव्या व्हायरल व्हिडीओंनी भरलेलं असतं. काही क्षणात हसवतात, काही धक्का देतात, तर काही नकळत डोळे पाणावतात.. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे, जो पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. हा व्हिडीओ केवळ चोरीची घटना दाखवत नाही, तर भुकेशी लढणाऱ्या एका माणसाची असहाय्यता मांडतो. माणूस गरिबीमुळे किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा व्हायरल व्हिडीओ.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचं सांगितलं जात आहे. एका छोट्या किराणा दुकानात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकानात अनेक महागड्या वस्तू असतानाही एक माणूस केवळ पोळीसाठी चोरी करतो, ही बाब सगळ्यांनाच हादरवणारी आहे. हा व्हिडीओ पाहून ‘चोर’ या शब्दाचा अर्थच अनेकांनी नव्याने विचारात घेतला आहे.

व्हिडीओमध्ये एक साधा, थकलेला माणूस दुकानात येतो. त्यावेळी दुकानदार जेवण करत असतो. तो माणूस काहीतरी सामान मागतो आणि दुकानदार आतून वस्तू आणायला जातो. दुकानात मोबाईल, इतर महाग वस्तू समोर असतानाही तो माणूस त्याला हात लावत नाही. तो शांतपणे फक्त एक पोळी उचलतो आणि खिशात ठेवतो.

दुकानदार परत आल्यावर त्याला संशय येतो. दुकानदाराला वाटते की त्याने फोन चोरला आहे. पण, दुकानात बसलेला दुकानदाराचा मुलगा फोन घेतो. मग तो त्या माणसाला प्रश्न विचारतो आणि रागाच्या भरात त्याला चापटही मारतो. नंतर त्याचे खिशे तपासतो. खिशातून जेव्हा फक्त एकच पोळी निघते, तेव्हा सगळेच स्तब्ध होतात. तो माणूस रडत पोळी हातात धरतो. त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याची परिस्थिती सांगत असते.

पाहा व्हिडीओ

हे पाहून दुकानदारालाही आपली चूक लक्षात येते. तो त्या माणसाला पोळी परत देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अपमान आणि वेदनेने तुटलेला तो माणूस पोळी घेण्यास नकार देतो. हा क्षण इतका हृदयद्रावक आहे की व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण काही वेळ भावूक होईल. हा माणूस चोर नसून, भुकेने हतबल झालेला एक सामान्य माणूस असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर @nehraji779 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि प्रतिक्रिया दिल्या. “असा चोर कधी पाहिला नव्हता, जो सोनं सोडून पोळी चोरतो,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.तर काहींनी “भूक माणसाला किती खाली आणू शकते हे या व्हिडीओत दिसतं,” असं म्हटलं आहे. अनेकांनी पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ केवळ व्हायरल कंटेंट नाही, तर माणुसकीला प्रश्न विचारणारे एक जिवंत उदाहरण आहे.