जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या सहा लाखांहून अधिक झाली असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीकेमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाउनचे नियम हळहळू शिथिल करत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक देशांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच अनेकजण हळहळू कामावर रुजू होताना दिसत आहेत. मात्र मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांची बंधन घालून देण्यात आली आहेत.

नक्की पाहा >> Video : मास्क लावल्यावर चष्म्यावर बाष्प जमा होतेय?; ट्राय करा ‘या’ तीन सोप्या ट्रीक्स

मास्क तर आता कपडे किंवा चप्पलांप्रमाणेच झाले असून मास्कशिवाय घराबाहेर पडणार नाही अशी भूमिका अनेकांनी घेतल्याचे दिसून येत आहे. असं असलं तरी काहीजण मात्र या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क घालूनच घराबाहेर पडावे असा सल्ला अगदी सरकारी यंत्रणांपासून ते आरोग्य तज्ज्ञांनीही दिला असतानाच काहीजण मास्क न लावताच रस्तावर फिरताना दिसत आहेत. अशाच बेजबाबदार लोकांचा समाचार घेण्यासाठी एका व्यक्तीने चक्क गाढवाची मुलाखत घेतली आहे.

ओडिशामधील आयपीएस अधिकारी असणाऱ्या अरुण बोथरा यांनी ट्विटवरुन एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी या व्हिडिओला, “ही लॉकडाउनच्या कालावधीमध्ये प्रसारमाध्यमांनी घेतलेली सर्वोत्तम मुलाखत” असं म्हटलं आहे. मंगळवारी शेअर केलेला हा व्हिडिओ सहा हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे.

नक्की पाहा >> Video : ‘करोना वरोना काही नाहीय’ म्हणत करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा हॉस्पिटलच्या गच्चीवर डान्स

काय आहे व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींप्रमाणे बूम घेऊन चक्क गाढवाची मुलाखत घेताना दिसत आहे. तो या गाढवाला, “तू मास्क लावलं नाहीय. मास्क न लावता तू रस्त्यावर का बसला आहेस?” असं विचारताना दिसत आहे. जवळच उभ्या असणाऱ्या आणि गाढवाची मुलाखत पाहणाऱ्या व्यक्तीकडे जात हा व्हिडिओमधील रिपोर्टर त्यालाही मास्क न घातलेल्या गाढवाबद्दल विचारताना दिसतो. “त्याने मास्क घातलं नाहीय तो काही बोलत नाहीय” असं म्हणतं हा रिपोर्टर त्या व्यक्तीकडे बूम नेतो तेव्हा, “तो बोलणारा प्राणी नाहीय” असं ही व्यक्ती सांगते. “पण कोणता प्राणी आहे हा? त्याला काय म्हणतात?” या प्रश्नाला ती मास्क न लावलेली व्यक्ती ‘गाढव’ असे उत्तर देते. त्यावर हा मुलाखत घेणार रिपोर्टर, “गाढव हे लॉकडाउनमध्ये बाहेर फिरत आणि मास्क लावत नाही” असं म्हणतो. मात्र या रिपोर्टरने केलेला उपहासात्मक विनोद या व्यक्तीला कळत नाही.

नक्की पाहा >> Viral Video : वाघाच्या रस्त्यात अजगर आडवा येतो तेव्हा

या व्हिडिओला मागील दोन दिवसांमध्ये तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.